मर्डर मिस्ट्री! आधी लव्ह मॅरेज, नंतर शेजाऱ्यावर प्रेम; पतीची हत्या करुन मनालीमध्ये हनिमून अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 10:33 IST2025-03-19T10:33:26+5:302025-03-19T10:33:58+5:30
मुस्कान सौरभच्या प्रेमात पडली, त्याच्याशी लग्न केलं पण नंतर तिने त्याचाच काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

फोटो - आजतक
मेरठची मुस्कान सौरभच्या प्रेमात पडली, त्याच्याशी लग्न केलं पण नंतर तिने त्याचाच काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिने सौरभला मारलं, मृतदेहांचे तुकडे केले आणि ते प्लास्टिकच्या ड्रममध्ये ठेवण्यात आले होते आणि नंतर त्यावर सिमेंट ओतण्यात आलं, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. मुस्कानने घराला कुलूप लावून सर्वांना पतीसोबत बाहेर जात असल्याचं खोटं सांगितलं. पण सत्य लपून राहिलं नाही. मुस्कानचा पर्दाफाश झाला आणि संपूर्ण मेरठ हादरून गेलं.
सौरभ आणि मुस्कान यांची भेट २०१५ मध्ये झाली. ते प्रेमात पडले आणि २०१६ मध्ये त्यांनी लग्न केलं. दोघेही आनंदी होते; त्यांना एक गोंडस मुलगीही आहे. सौरभ हा मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी होता आणि बराच काळ कामानिमित्त बाहेर असल्याने मुस्कान तिच्या मुलीसोबत मेरठमध्ये भाड्याच्या घरात एकटी राहत होती. २०१९ मध्ये मुस्कानच्या आयुष्यात साहिल आला, जो त्याच परिसरात राहत होता. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री होती, पण ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. साहिल आता मुस्कानच्या आयुष्याचा आणि सौरभच्या अनुपस्थितीत तिच्या घराचाही एक भाग बनला होता.
२५ फेब्रुवारी रोजी मुस्कानचा वाढदिवस होता. तिला वाढदिवस खास करायचा होता. तिने सौरभची हत्या करायचं ठरवलं. सौरभ लंडनहून मेरठला परतला होता, पण त्याला कल्पनाही नव्हती की हा त्याचा शेवटचा प्रवास असेल. मुस्कान आणि साहिल यांनी मिळून हे भयानक कट रचला. ४ मार्चच्या रात्री सौरभ घरात झोपायला जाताच, मुस्कानने इशारा केला आणि साहिलने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. यामध्येच सौरभचा मृत्यू झाला.
मुस्कान-साहिल तीन दिवस मनालीत राहिले
मुस्कानने ती आणि सौरभ हिमाचलला फिरायला जात आहेत असं परिसरात सांगितलं. यानंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून तिने घराला कुलूप लावलं. साहिल आणि मुस्कानने मिळून एक प्लास्टिकचा ड्रम विकत घेतला. त्यांनी सौरभच्या शरीराचे तुकडे केले आणि ते एका ड्रममध्ये भरले. नंतर त्यात सिमेंट ओतलं. सौरभच्या हत्येनंतर, मुस्कान आणि साहिल तीन दिवस मनालीत राहिले. दोघांनी तिथेच हनिमून साजरा केल्याचं म्हटलं जातं. ती सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत होती.
एका चुकीने झाला पर्दाफाश
मुस्कानला वाटलं की, ती तिचा भयंकर कट लपवू शकेल, पण एका चुकीने तिचा पर्दाफाश झाला. तिने ही संपूर्ण घटना तिच्या आईला सांगितली. कदाचित तिला वाटलं असेल की तिची आई तिला वाचवेल, पण तिच्या आईने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी मुस्कानची चौकशी केली तेव्हा ती प्रथम घाबरली आणि नंतर एकामागून एक खोटे बोलू लागली. पण साहिलची चौकशी होताच त्याने हत्या केल्याचं कबूल केलं.