धक्कादायक! अमेरिकेत भारतीय तरुणीचा खून करून प्रियकर भारतात पसार; पोलिसांना भेटून आला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 08:49 IST2026-01-05T08:48:59+5:302026-01-05T08:49:14+5:30
Nikita Godishla murder: अमेरिकेतील मेरीलँडमध्ये २७ वर्षीय निकिता गोडिशलाचा मृतदेह तिच्या माजी प्रियकराच्या फ्लॅटमध्ये आढळला. आरोपी अर्जुन शर्माने हत्येनंतर स्वतःच तक्रार दिली आणि भारत गाठले. वाचा सविस्तर.

धक्कादायक! अमेरिकेत भारतीय तरुणीचा खून करून प्रियकर भारतात पसार; पोलिसांना भेटून आला...
वॉशिंग्टन/कोलंबिया: अमेरिकेतील मेरीलँड राज्यातून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. २७ वर्षीय भारतीय डॉक्टर निकिता गोडिशला हिची तिच्या प्रियकराने चाकूने वार करून निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी अर्जुन शर्मा याने निकिताचा मृतदेह स्वतःच्याच घरात लपवला, पोलिसांत ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली आणि काही तासांतच विमानाने भारतात पळ काढला.
निकिता गोडिशला ३१ डिसेंबर (थर्टी फर्स्ट) च्या संध्याकाळपासून बेपत्ता होती. २ जानेवारी रोजी अर्जुन शर्माने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन निकिता बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्याने पोलिसांना सांगितले की, निकिता शेवटची त्याच्या कोलंबियातील अपार्टमेंटमध्ये दिसली होती. मात्र, तक्रार दिल्यानंतर काही वेळातच अर्जुनने अमेरिकेतून भारताचे विमान पकडले आणि तो फरार झाला.
तपासात धक्कादायक खुलासा
३ जानेवारी रोजी जेव्हा हावर्ड काउंटी पोलिसांनी अर्जुनच्या फ्लॅटची झडती घेतली, तेव्हा त्यांना निकिताचा मृतदेह आढळला. तिच्या शरीरावर चाकूने वार केल्याच्या अनेक खुणा होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबर रोजी रात्री ७ च्या सुमारास निकिताची हत्या झाली असावी असा संशय आहे. मृतदेह घरात असतानाही अर्जुन दोन दिवस तिथेच होता आणि त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
अमेरिकन पोलिसांनी अर्जुन शर्मा विरुद्ध 'फर्स्ट आणि सेकंड डिग्री मर्डर'चे वॉरंट जारी केले असून त्याला पकडण्यासाठी अमेरिकन फेडरल एजन्सी आणि भारत सरकारशी संपर्क साधला जात आहे.
कोण होती निकिता गोडिशला?
निकिता ही एक अत्यंत हुशार आरोग्य कर्मचारी आणि डेटा ॲनालिटिक्स व्यावसायिक होती. ती मूळची भारतातील असून मेरीलँडमधील एलिकॉट सिटी येथे राहत होती. भारतीय दूतावासाने या प्रकरणाची दखल घेतली असून निकिताच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.