सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 19:59 IST2019-11-14T19:57:52+5:302019-11-14T19:59:01+5:30
माहेरहून हुंडा आणण्यासाठी वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पिंपरी : सासरच्या त्रासाला कंटाळून २४ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. ११) नवी सांगवी येथे घडली. याबाबत सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपाली भूषण गरुड (वय २४) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पांडुरंग मधुकर ठोंबरे (वय ३२, रा. दिघी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भूषण रामदास गरुड (वय २८), रामदास गरुड (वय ६५), सुलोचना गरुड (वय ६०), दीपा विवेक पाटील (वय ३०, सर्व रा. औंध, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या मंडळींनी मयत दिपाली यांना माहेरहून हुंडा आणण्यासाठी वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास दिला. सासरच्या या त्रासाला कंटाळून दीपाली यांनी सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून सासरच्या चार जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.