भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 10:24 IST2025-11-17T10:23:41+5:302025-11-17T10:24:27+5:30
मध्य प्रदेशातील मुरैना महानगरपालिकेत भ्रष्टाचार आणि लाचखोरी पाहायला मिळाली आहे.

फोटो - आजतक
मध्य प्रदेशातील मुरैना महानगरपालिकेत भ्रष्टाचार आणि लाचखोरी पाहायला मिळाली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कायदेशीर कामासाठी लाच मागितली तेव्हा ही धक्कादायक परिस्थिती उघडकीस आली. एका तरुणाने धाडस दाखवत थेट महापौरांशी संपर्क साधला आणि त्यांच्या मोबाईलवरून लाचखोरीचा पर्दाफाश केला, ज्यामुळे महापालिकेत आता खळबळ उडाली.
मुरैना येथील पंकज राठोड यांच्याशी संबंधित ही घटना आहे. पंकज राठोड याला त्याची जमीन हस्तांतरित करायची होती आणि त्यावर घर बांधण्याची परवानगी मिळवायची होती. या संदर्भात पंकज राठोडने मुरैना महानगरपालिकेतील एका कर्मचाऱ्याशी संपर्क साधला, ज्याने योग्य शुल्क वसूल करण्याव्यतिरिक्त, विविध अधिकाऱ्यांसाठी लाचखोरीची "रेट लिस्ट" देखील उघड केली.
धक्कादायक बाब म्हणजे, पैशांची देवाणघेवाण होऊनही पंकज राठोड याचं हे काम अपूर्णच राहिलं. त्यानंतर पंकज राठोड थेट महानगरपालिकेच्या महापौर शारदा सोलंकी यांच्याकडे गेला. येथे महापौरांसमोर त्याने महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांशी फोनवर बोलून कोणत्या अधिकाऱ्याला किती लाच दिली जाईल याची माहिती घेतली.
महापौर शारदा सोलंकी यांनीही या प्रकरणाची माहिती महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिली. महानगरपालिकेचे आयुक्त सत्येंद्र धाकरे यांनी सांगितलं की, या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल. ही बाब महापौरांसमोर आणण्यात आली होती. ती अद्याप माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही. मी या प्रकरणाची चौकशी करेन आणि जर कोणी दोषी आढळलं तर कारवाई केली जाईल.