अश्लील व्हिडीओ बनवून धमकी,धर्मांतर करुन लावले लग्न; बाबासह चार जणांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 07:36 IST2020-12-09T23:51:44+5:302020-12-10T07:36:33+5:30
Jalgaon Crime News : देशभरात गाजत असलेल्या ‘आश्रम’ या वेबसिरीजशी मिळती-जुळती कहाणी जळगाव जिल्ह्यात उघडकीस आली आहे.

अश्लील व्हिडीओ बनवून धमकी,धर्मांतर करुन लावले लग्न; बाबासह चार जणांविरुद्ध गुन्हा
जळगाव : देशभरात गाजत असलेल्या ‘आश्रम’ या वेबसिरीजशी मिळती-जुळती कहाणी जळगाव जिल्ह्यात उघडकीस आली आहे. एका कथित मौलवी बाबाने नाशिक येथील महिलेस अश्लील व्हिडीओचा धाक दाखवून धर्मांतर करुन लग्नही लावले. बाबाच्या वासनांध कृत्यांची आपबीती पीडीत महिलेने बुधवारी सोशल मीडियावर मांडली. याप्रकरणी बाबासहचार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरी दिगर ता. जामनेर येथे ही घटना उघडकीस आली आहे.
अल्ताफ मोहसीन मनियार उर्फ अलीबाबा (रा.नेरी दिगर ता.जामनेर) असे या कथित बाबाचे नाव आहे. त्याच्यासह ताहेर रिहासत शेख, सोहेल अंसारी (सर्व रा. मालेगांव) व श्रुती दिलीप सतडेकर (रा. मुंबई) अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने सांगितलेल्या आपबीतीनुसार, सन २०१७ मध्ये तिला एका महिलेने अलिबाबा याचा मोबाईल नंबर दिला. तुमचा कौटुंबिक कलह मिटवून समाधान करून देतो, म्हणत त्याने ५० हजार रुपये मागितले. महिलेने त्यास होकार दिला. त्यानंतर अल्ताफ हा या महिलेस मालेगाव येथून नेरी येथील आश्रमात घेऊन आला. तिथे त्याने आपणास संमोहित केले. दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यावर बाबाने आपणास अश्लील व्हिडीओ दाखवून धमकी देण्यास सुरुवात केली. तसेच धर्मांतर करुन लग्नही लावले आणि त्याने पहिली पत्नी व मुलगा असल्याचे लपविले.
दुसरीकडे आपणास धमकी देत वेळोवेळी अंदाजे अडीच लाख रुपये उकळले. आपण त्याचे घर सोडून माहेरी निघून गेले. त्यानंतर पोलिसात तक्रार देण्यास जाणार त्याआधीच बाबाने आपल्या मुलाचे अपहरण केले. त्यानंतर सोहेल अन्सारी आणि एका महिलने धमकी दिली. याबाबत जामनेर पोलिसात दि. ६ ऑक्टोबर रोजी भादंवि कलम ३८४, ३८५ (खंडणी), ४९४ (पहिली पत्नी हयात असताना दुसरीशी लग्न), ३२३ (मारहाण) आणि ५०६ (३४)(धमकी)या प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक अंबादास पाथडकर, हेकॉ अरविंद मोरे,विनोद पाटील तपास करीत आहे.
" अल्ताफ मनियारने फिर्यादी महिलेसोबत लग्न केले आहे. सन २०१७ पासून ते मालेगांव येथे राहतात. २०१९ मध्ये तो १५ दिवसांसाठी नेरी येथे आला होता. दोघेही नेरी येथे राहत नाही.फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीसांचे पथक माहिती घेण्यासाठी मालेगांव येथे पाठविले होते. चौकशी सुरु आहे.
- प्रताप इंगळे
(पोलीस निरीक्षक, जामनेर)