गंगेच्या घाटावर डेथ सर्टिफिकेटसाठी मोठा कट; कर्मचाऱ्याला मृत दाखवून अंत्यसंस्काराची तयारी केली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 11:40 IST2025-11-28T11:23:18+5:302025-11-28T11:40:02+5:30
उत्तर प्रदेशात जिवंत व्यक्तीला मृत दाखवून त्याचे डेथ सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मोठा कट रचल्याची घटना समोर आली आहे.

गंगेच्या घाटावर डेथ सर्टिफिकेटसाठी मोठा कट; कर्मचाऱ्याला मृत दाखवून अंत्यसंस्काराची तयारी केली अन्...
UP Crime:उत्तर प्रदेशच्या गढमुक्तेश्वरच्या ब्रजघाट गंगा घाटावर बुधवारी एक अत्यंत अविश्वसनीय आणि संशयास्पद घटना उघडकीस आली. ज्यामुळे प्रशासनासह सर्वांनाच जबर धक्का बसला. गंगा घाटावर हरियाणा पासिंगच्या नंबरच्या एका कारमधून आलेल्या चार तरुणांनी एका मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्याची तयारी चालवली होती. पण हा सगळा एका मोठ्या गुन्हेगारी कटाचा भाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सुमारे संध्याकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी चार तरुण एका पांढऱ्या चादरीत एक मृतदेह घेऊन घाटावर पोहोचले. त्यांनी कोणतेही धार्मिक विधी न करता, अत्यंत घाईघाईने अंत्यसंस्कार उरकण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांच्या या संशयास्पद कृतीमुळे स्थानिक नागरिक आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले. लोकांनी जेव्हा मृतदेहावरील कपडा बाजूला केला तेव्हा त्यांना जबर धक्का बसला. त्यांच्या हातात एक माणसाच्या आकाराचा, प्लॅस्टिकचा डमी पुतळा होता.
गाडीतून आलेल्या तरुणांचा उद्देश काहीतरी गंभीर कट रचण्याचा आहे हे लक्षात येताच, लोकांनी कमल सोमानी आणि आशीष खुराना या दोन तरुणांना पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांचे अन्य दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पोलिसांनी दोघांकडे चौकशी केली असता धक्कादायक खुलासा झाला.
कर्जात बुडालेला आरोपी आणि ५० लाखांसाठी 'डेथ सर्टिफिकेट'चा प्लॅन
पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेले दोन्ही तरुण दिल्लीचे रहिवासी आहेत. मुख्य आरोपी कमल सोमानी याच्यावर सुमारे ५० लाख रुपयांचे मोठे कर्ज होते आणि हे कर्ज फेडण्यासाठीच त्याने ही योजना आखली होती. कमलने त्याचा पूर्वीचा कर्मचारी अंशुल कुमार याचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड चोरून ठेवले होते. अंशुलच्या नकळत, कमलने त्याच्या नावावर ५० लाख रुपयांची जीवन विमा पॉलिसी काढली होती आणि गेल्या काही महिन्यांपासून तो नियमितपणे तिचे हप्ते भरत होता. विम्याचे पैसे मिळवण्यासाठी अंशुलचा मृत्यू झाल्याचे सिद्ध करणे आवश्यक होते. त्यासाठी डेथ सर्टिफिकेट मिळवणे महत्त्वाचे होते.
डेथ सर्टिफिकेट मिळवण्यासाठी, अंशुलच्या मृतदेहाऐवजी पुतळा जाळून अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आणि त्याचे प्रमाणपत्र मिळवण्याचा त्यांचा हेतू होता. मात्र स्थानिकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला. पोलिसांनी अंशुल कुमारचा शोध घेतला असता, तो पूर्णपणे सुखरुप असून प्रयागराज येथील त्याच्या घरी सुखरूप असल्याचे आढळले. कमल सोमानी आणि आशीष खुराना हे मृत्यू प्रमाणपत्र मिळवून विम्यासाठी क्लेम दाखल करण्याच्या उद्देशानेच हा बनावट अंतिम संस्कार करण्यासाठी आले होते.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कार जप्त केली आणि दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.