५ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी महावितरण अभियंता जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 19:40 IST2019-04-24T19:38:35+5:302019-04-24T19:40:36+5:30
बुलडाणा लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली.

५ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी महावितरण अभियंता जेरबंद
नांदुरा - ग्राहकाकडून ५ हजार रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास लाच लुचपत विभागाने २४ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता अटक केली. बुलडाणा लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली.
चांदूरबिस्वा येथील एका ग्राहकाच्या वीज मीटरमध्ये बिघाड झाला आहे. हा बिघाड ग्राहकाने स्वत:हून केला असा आरोप करीत हे प्रकरण मिटवायचे असल्यास पाच हजार रुपये द्यावे लागतील किंवा महावितरण मलकापूर कार्यालयात १५ हजार रुपये भरावे लागतील. असा निरोप कंत्राटी कर्मचाऱ्यामार्फत वडनेर भोलजी येथीला महावितरणचे सहाय्यक अभियंता अनंत प्रल्हाद वराडे (वय ४०) यांनी दिला. तडजोडीनंतर ५ हजार रुपये देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे ग्राहकाने नांदुरा येथील पंचायत समिती कार्यालयासमोरील रसवंतीसमोर पाच हजार रुपये घेतांना कंत्राटी कर्मचारी प्रविण रामदास चिमणकर (वय २३) रा. चांदुरबिस्वा ता. नांदुरा यास रंगेहाथ पकडले. हे पैसे त्याने सहाय्यक अभियंता याच्या सांगण्यावरून घेतले असल्याची कबूली दिली. त्यावरून सहाय्यक अभियंता अनंत प्रल्हाद वराडे यांना अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलिस निरिक्षक अर्चना जाधव यांच्या मार्गदशनात करण्यात आली.