शारिरीक संबंध प्रस्थापित केले तर चित्रपटांत काम देईन, दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे मागितले 'इंटिमेट फोटो'; मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 14:23 IST2022-01-11T14:23:36+5:302022-01-11T14:23:41+5:30
पोलिसांनी एका दिग्दर्शकाला अटक केली आहे. चित्रपटात कास्ट करण्याच्या बदल्यात त्याने एका अभिनेत्रीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केल्याचा आरोप आहे.

शारिरीक संबंध प्रस्थापित केले तर चित्रपटांत काम देईन, दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे मागितले 'इंटिमेट फोटो'; मग...
मुंबई- मायानगरी मुंबईत अनेक तरुण-तरुणी स्टार बनण्याचे स्वप्न घेऊन येतात. मात्र, अनेक वेळा अशाही घटना घडतात, की त्यांचा सामना वाईट प्रवृत्तीच्या लोकांशी होतो. आता बॉलिवूडमधून कास्टिंग काउचचे आणखी एक ताजे प्रकरण समोर आले आहे. येथे एका दिग्दर्शकाला पोलिसांनी अटक केली आहे. चित्रपटात कास्ट करण्याच्या बदल्यात त्याने एका अभिनेत्रीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केल्याचा आरोप आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, कास्टिंग काउच प्रकरणी पोलिसांनी टिटवाळा भागातून एका दिग्दर्शकाला अटक केली आहे. मालाड पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर धनंजय लिगाडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे इंटिमेट फोटोंची मागणी केली होती. एवढेच नाही तर, जेव्हा अभिनेत्रीने रिलेशनशिपला नकार दिला, तेव्हा त्याने हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
यानंतर अभिनेत्रीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून दिग्दर्शकाला अटक करण्यात आली आहे. अभिनेत्री आणि दिग्दर्शक या दोघांचीही नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. अशा प्रकरणात अटक होण्याची ही पहिलीच वेळ नाही अथवा असे प्रकरण समोर येण्याचीही ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही अनेवेळा असे घडले आहे.
गेल्या काही दिवसांत, अनेक मुलाखतींमध्ये बॉलिवूडमधील काही अभिनेते आणि अभिनेत्रींनी कास्टिंग काउचसंदर्भात उघडपणे भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वीच बॉलीवूड अभिनेत्री सुरवीन चावलानेही कास्टिंग काउच आणि बॉडी शेमिंगचा सामना करावा लागल्यासंदर्भात खुलासा केला होता. जेव्हा आपण चित्रपटांमध्ये येणार होतो, तेव्हा चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी आपल्याला आपल्या शरीराच्या अवयवांच्या साईजसंदर्भात प्रश्न केले होता, असे तिने म्हटले होते.