Mafia Atiq Ahmed Murder : कॅमेऱ्यासमोर मर्डर अन् नंतर सरेंडर...; अतीकचे तिन्ही मारेकरी पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 00:09 IST2023-04-16T00:07:03+5:302023-04-16T00:09:25+5:30
आजच अतीक अहमदचा मुलगा असदचा पोलीस बंदोबस्तात कसारी-मसारी कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला होता.

Mafia Atiq Ahmed Murder : कॅमेऱ्यासमोर मर्डर अन् नंतर सरेंडर...; अतीकचे तिन्ही मारेकरी पोलिसांच्या ताब्यात
माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. प्रयागराजमधील मेडिकल कॉलेजबाहेर ही घटना घडली. यापूर्वी 13 एप्रिलला झांसी जिल्ह्यातील परीछा डॅम भागात अतीकचा मुलगा असद आणि मुहम्मद गुलाम यांचा पोलीस एनकाउंटरमध्ये मृत्यू झाला होता. आजच अतीक अहमदचा मुलगा असदचा पोलीस बंदोबस्तात कसारी-मसारी कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला होता.
तीन लोकांनी झाडल्या गोळ्या -
प्रयागराजमधील मेडिकल कॉलेजबाहेर तीन जणांनी जय श्री राम, अशा घोषणा देत अतिक आणि त्याचा भाऊ अश्रफवर गोळ्या झाडल्या. यानंतर या तिघांनीही तत्काळ आत्मसमर्पण केले आहे.
झासीत झाले होते असद आणि गुलामचे एनकाउंटर -
उत्तर प्रदेश एसटीएफने अतिक अहमदचा मुलगा असद आणि शूटर गुलाम यांचे झासीमध्ये पारीछा डॅमजवळ एन्काउंटर केले होते. हे एन्काउंटर अशा ठिकाणी केले गेले, जेथे पुढे जाण्याचा रस्ता बंद होता. या चकमकीत दोन्ही बाजूंनी 40 राऊंड गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. यासंदर्भात बोलताना, दोघांनाही जिवंत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्यांनी गोळीबार सुरू केला, असे पोलिसांनी म्हटले होते.
4 जणांचं एनकाउंटर, 3 जणांचा शोध सुरू -
उमेश पाल हत्याकांडात पोलीस अतीक अहमदचा मुलगा असद, अरमान, गुलाम, गुड्डू मुस्लिम आणि साबिर यांच्या शोधात होते. यांच्यावर 5-5 लाख रुपयांचे बक्षिसही घोषित करण्यात आले होते. पोलिसांनी असद आणि गुलाम यांचे एनकाउंटर केले. तीन शूटर अरमान, गुड्डू मुस्लिम आणि साबिर यांचा शोध सुरू आहे. यापूर्वी पोलिसांनी दोन शूटर अरबाज आणि विजय चौधरी उर्फ उस्मान यांचे एनकाउंटर केले होते.