विद्यार्थिनीच्या अंगावर बसू केले सपासप वार; १० मिनिटांत हत्या करुन आरोपी पसार, लोक मृत्यूपर्यंत व्हिडिओ राहिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:36 IST2025-07-01T17:30:42+5:302025-07-01T17:36:34+5:30
मध्य प्रदेशात एका रुग्णालयात एकतर्फी प्रेमातून तरुणाने एका विद्यार्थिनीची निर्घृणपणे हत्या केली.

विद्यार्थिनीच्या अंगावर बसू केले सपासप वार; १० मिनिटांत हत्या करुन आरोपी पसार, लोक मृत्यूपर्यंत व्हिडिओ राहिले
Narsinghpur Hospital Murder Case: मध्य प्रदेशात एकतर्फी प्रेमातून हत्येची हादरवणारी घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्हा रुग्णालयात नर्सिंगचे प्रशिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीची दिवसाढवळ्या गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये आरोपी तरुणीचा गळा चिरताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेत आरोपीने संध्या चौधरी नावाच्या विद्यार्थिचा दिवसाढवळ्या चाकूने गळा चिरून खून केला. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडत असताना कोणीही मदतीसाठी पुढे आलं नाही. लोक या घटनेचा व्हिडीओ काढण्यात व्यस्त होते.
२७ जून रोजी नरसिंहपूर जिल्हा रुग्णालयात माथेफिरु तरुणाने एकतर्फी प्रेमातून बारावीच्या विद्यार्थिनी असलेल्या संध्या चौधरीची निर्घृण हत्या केली. या घटनेचा व्हिडिओ सोमवारी समोर आला. व्हिडिओमध्ये आरोपी अभिषेक कोष्टी संध्याचा गळा चिरताना दिसत आहे. आरोपी अभिषेक स्वतःचाही गळा चिरण्याचा प्रयत्नही करत आहे. रुग्णालयात उपस्थित असलेले लोक हा सगळा प्रकार पाहत होते पण कोणीही संध्याला वाचवण्यासाठी पुढे आलं नाही. आरोपी अभिषेकने संध्याला पकडलं आणि तिच्यावर चाकूने वार करत तिला खाली पाडलं. यानंतर, तो तिच्या छातीवर बसला आणि १० मिनिटे
चाकूने गळा चिरत राहिली. संध्याची हत्या केल्यानंतर आरोपी पळून गेला.
आरोपी अभिषेक त्या दिवशी दुपारी १२ वाजल्यापासून रुग्णालयात संध्याची वाट पाहत होता. दुपारी २:३० वाजता संध्या रुग्णालयात आली महिलांच्या वॉर्डमध्ये गेली. तिथून बाहेर येताच अभिषेकने संध्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. दोघे पाच मिनिटे बोलत होते. संध्याला अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर ती ट्रॉमा सेंटरमध्ये गेली. अभिषेकही तिच्या मागे गेला. त्यानंतर संध्या ट्रॉमा सेंटरच्या २२ नंबर खोलीच्या बाहेर एका खुर्चीवर बसली. अभिषेक पुन्हा तिच्या जवळ गेला आणि ते दोघेही भांडू लागले. अभिषेकने संध्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने संध्यावर चाकूने निर्घृणपणे हल्ला केला. १० मिनिटे तो तिच्या गळ्यावर वार करत होता. यामध्ये त्याने स्वतःच्याही गळ्यावर वार केले. त्यानंतर तो उठला आणि रुग्णालयाबाहेर लावलेली बाईक घेऊन पळून गेला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस तपासादरम्यान मृतदेह सुमारे साडेसात तास घटनास्थळीच पडला होता. संध्याच्या संतप्त कुटुंबाने गोंधळ घातल्याने कारवाईचे आश्वासन देण्यात आलं. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी तपास करुन आरोपी अभिषेकला ताब्यात घेतलं.
चौकशीदरम्यान आरोपी अभिषेकने सांगितले की, "आम्ही अडीच वर्षांपूर्वी सोशल मीडियावर भेटलो होतो. त्यानंतर आमच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. गेल्या अडीच वर्षांत त्यांच्यात कधीही भांडण झालं नव्हतं. पण गेल्या महिन्याभरापासून ती माझ्याकडे दुर्लक्ष करत होती. तिने माझा नंबर ब्लॉक केला. मला संशय आल्यावर मी तिच्यावर लक्ष ठेवू लागलो. मला कळले की ती दुसऱ्या कोणाशी तरी बोलत होती. ती मला फसवत होती. मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तिने ऐकले नाही. यानंतर, मी तिला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला."