बलात्कार प्रकरणात MP च्या मिर्ची बाबाला अटक, मूल होत नव्हतं म्हणून गेली होती पीडित महिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 15:24 IST2022-08-09T15:23:39+5:302022-08-09T15:24:40+5:30
पीडितेच्या जबाबानंतर, वैराग्यानंद गिरीवर (मिर्ची बाबा) कलम 376, 506 आणि 342 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

बलात्कार प्रकरणात MP च्या मिर्ची बाबाला अटक, मूल होत नव्हतं म्हणून गेली होती पीडित महिला
गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दिग्विजय सिंहांसाठी निवडणूक प्रचार करून चर्चेत आलेल्या वैराज्ञानंद गिरी (मिर्ची बाबा) यांना भोपाळ महिलापोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेने मिर्ची बाबावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. मूल होत नसल्याने आपण बाबाला भेटलो, याचाच गैरफायदा घेत बाबाने आपल्यावर अत्याचार केला. तसेच, यासंदर्भात कुणालाही सांगू नको, अशी धमकीही दिली, असे संबंधित पीडितेने म्हटले आहे.
पीडितेच्या जबाबानंतर, वैराग्यानंद गिरीवर (मिर्ची बाबा) कलम 376, 506 आणि 342 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पीडित महिला राजधानी भोपाळजवळील रायसेन जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, आपल्या लग्नाला चार वर्षे झाली आहेत, मात्र, मूल नाही. म्हणून आपण मिर्ची बाबाच्या संपर्कात आलो. बाबांनी पूजा करून अपत्य होईल, असा दावा केला होता. त्याने आपल्याला बोलावून उपचाराच्या नावाने नशेच्या गोळ्या खायला दिल्या आणि बलात्कार केला. ही घटना या वर्षीच्या जुलै महिन्यातील आहे. एवढेच नाही, तर विरोध केला असता, 'मुलगा असाच होतो,' असे बाबा म्हणाला.
संबंधित महिलेने सोमवारी महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर मिर्ची बाबाला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. त्याला ग्वाल्हेरमध्ये अटक करून भोपाळला नेण्यात आले आहे. त्याची चौकशी सुरू आहे.