भाच्यांना नोकरीचे आमिष दाखवून मामाला लावला चुना, मंत्रालयात काम करत असल्याची मारली थाप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 21:05 IST2022-03-08T21:04:49+5:302022-03-08T21:05:17+5:30
Fraud case : - साडेपाच लाख रुपये हडपले

भाच्यांना नोकरीचे आमिष दाखवून मामाला लावला चुना, मंत्रालयात काम करत असल्याची मारली थाप
नागपूर - दोन भाच्यांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका दुकल्लीने मामाला साडेपाच लाखांची टोपी घातली. संजय आकोटकर आणि नीलेश नानवटकर अशी आरोपींची नावे आहेत. यातील आकोटकर नागपूरचा तर नानवटकर मुंबईचा रहिवासी आहे.
संतोष दियेवार (वय ४१)हे त्रीमुर्तीनगरात राहतात. त्यांचे दोन भाचे चांगली नोकरी शोधत आहेत. त्यांना चार वर्षांपूर्वी आरोपी आकोटकर भेटला. त्याने नानवटकरची भेट घालवून दिली. आपण मंत्रालयात असून मोठमोठी कामे करतो, अशी थाप नानवटकरने मारली. तुझ्या दोन भाच्यांना बँकेत सहज नोकरी लावून देतो, असेही त्याने सांगितले. आकोटकर ओळखीचा असल्याने नानवटकरवर विश्वास ठेवून चार वर्षांत दियेवारने आकोटकर तसेच नानवटकरला ५ लाख, ४७ हजार रुपये दिले. ही रोकड आपल्या बँक खात्यातून दियेवार यांनी आरोपींच्या बँक खात्यात जमा केली. मात्र, आरोपींनी नोकरी लावून दिली नाही. ते टाळाटाळ करीत असल्याने दियेवार यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार विद्या जाधव यांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.