जाऊबाई जोरात! बॉयफ्रेंडसोबत पसार झाल्या २ जावा, पती मारताहेत पोलीस ठाण्यात चकरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 14:11 IST2025-07-11T14:10:58+5:302025-07-11T14:11:33+5:30
दोन जावा घरातून एकत्र पळून गेल्या आहेत. दोन्ही महिला त्यांच्या बॉयफ्रेंडसह रोख रक्कम, दागिने घेऊन घरातून पसार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फोटो - nbt
मध्य प्रदेशच्या डबरा परिसरातील वॉर्ड क्रमांक ४ खेरी मोहल्ला येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली. दोन जावा घरातून एकत्र पळून गेल्या आहेत. दोन्ही महिला त्यांच्या बॉयफ्रेंडसह रोख रक्कम, दागिने घेऊन घरातून पसार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. २८ जून रोजी ही घटना घडली. तेव्हापासून दोन्ही महिलांचे पती डबरा शहर पोलीस ठाण्यात चकरा मारत आहेत.
तक्रारदार संतोष कुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो आणि त्याचा धाकटा भाऊ भूपेंद्र कुशवाह मजूर म्हणून काम करतात. ते दररोज सकाळी कामावर जायचे आणि संध्याकाळी उशिरा घरी परतायचे. याच दरम्यान त्यांच्या पत्नींचे त्याच परिसरातील दोन तरुण छोटू कुशवाह आणि अंश कुशवाह यांच्याशी प्रेमसंबंध होते. संतोषने दावा केला आहे की, मुलाने त्याची आई आणि काकूला या तरुणांशी बोलताना पाहिलं होतं. पण महिलांनी मुलाला धमकी दिली की, जर त्याने कोणाला सांगितलं तर ते त्याला मारतील. भीतीमुळे मुलगा गप्प राहिला.
२८ जून रोजी जेव्हा दोन्ही भाऊ कामावरून घरी परतले तेव्हा एक विचित्र दृश्य दिसलं. त्यांच्या पत्नी, लहान मुलगा आणि दागिने आणि रोख रक्कम घरातून गायब होत्या. त्यानंतर मुलाने सर्व प्रकार त्याच्या वडिलांना सांगितला. संतोषने छोटू आणि अंश कुशवाहवर महिलांचं अपहरण केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पोलीस ठाण्याचे प्रभारी यशवंत गोयल म्हणाले की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे. लवकरच दोन्ही महिलांना शोधण्यात येईल आणि त्या स्वतःहून गेल्या आहेत की कोणता दबाव आहे याचाही तपास केला जात आहे. फरार झालेल्यांपैकी एका महिलेने एका लहान मुलालाही सोबत नेलं आहे. या घटनेची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे.