धक्कादायक! बँकेतील लॉकरमधून सासू-सुनेचे दागिने गायब; चोरीची चर्चा होताच लोकांची मोठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:29 IST2026-02-18T13:26:51+5:302026-02-18T13:29:16+5:30
एक महिला आपल्या सासूसोबत बँकेतील लॉकर तपासण्यासाठी गेली असता लॉकरमधून दागिने चोरीला गेल्याचा आरोप त्यांनी केला.

धक्कादायक! बँकेतील लॉकरमधून सासू-सुनेचे दागिने गायब; चोरीची चर्चा होताच लोकांची मोठी गर्दी
दिल्लीतील कीर्ती नगर भागातील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत गुरुवारी प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. एक महिला आपल्या सासूसोबत बँकेतील लॉकर तपासण्यासाठी गेली असता लॉकरमधून दागिने चोरीला गेल्याचा आरोप त्यांनी केला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बँकेचं लॉकर फोडून सोनं चोरीला गेल्याच्या चर्चेने बँकेबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी झाली.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही महिला त्यांचं 'जॉइंट लॉकर' तपासण्यासाठी बँकेत पोहोचल्या होत्या. बँक कर्मचाऱ्यांनी नियमानुसार लॉकर उघडून दिलं, मात्र लॉकरमध्ये ठेवलेलं सोनं आणि दागिने गायब असल्याचा दावा महिलांनी केला. त्यांच्या तक्रारीनंतर बँकेत उपस्थित असलेल्या इतर ग्राहकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं. सोशल मीडियावरही पीएनबीच्या लॉकरमधून सोनं चोरीला गेल्याचे मेसेज फिरू लागल्याने खळबळ उडाली.
चोरीची अफवा पसरताच ज्या ग्राहकांचं लॉकर त्याच शाखेत होतं, ते घाबरून बँकेत धावून आले. बँकेबाहेर लोकांची मोठी गर्दी जमा झाली आणि प्रत्येकजण आपला लॉकर त्वरित तपासण्याची मागणी करू लागला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून बँक प्रशासनाने तात्काळ पोलिसांना पाचारण केलं.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी लॉकर रूमची पाहणी केली. प्राथमिक तपासात कोणताही लॉकर तोडल्याचं किंवा त्याच्याशी छेडछाड केल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. लॉकर रूमची सुरक्षा व्यवस्थाही सुरक्षित आढळली आहे. तपासादरम्यान असं समोर आलं की, संबंधित महिलांनी ५ फेब्रुवारी रोजी देखील हा लॉकर ऑपरेट केला होता. त्या दिवशी लॉकरमधून काय काढलं गेलं किंवा काय ठेवलं गेलं याचा तपास आता पोलीस करत आहेत. बँक व्यवस्थापनानेही ग्राहकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं आहे.