दुबईतून पळून आला पण जेवणाची ऑर्डर देताच फसला; १८ महिने पोलिसांना गुंगारा देणारा अखेर अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 15:16 IST2025-12-05T15:16:29+5:302025-12-05T15:16:50+5:30
दुबईतील ९०० कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपीला पोलिसांनी देहारादून येथून अटक केली.

दुबईतून पळून आला पण जेवणाची ऑर्डर देताच फसला; १८ महिने पोलिसांना गुंगारा देणारा अखेर अटकेत
Ravindra Nath Soni Arrest: दुबई आणि इतर देशांमध्ये गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून गेल्या १८ महिन्यांपासून फरार असलेला 'ब्लूचिप ग्रुप'चा संस्थापक रविंद्र नाथ सोनी याला अखेर भारतीय पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ४४ वर्षीय सोनीची ही अटक अत्यंत नाट्यमय पद्धतीने झाली, ज्याची सध्या जगभर चर्चा आहे. पोलिसांनी अनेक महिन्यांपासून ट्रॅक करत असलेला रविंद्र नाथला केवळ एक फूड डिलिव्हरी ऑर्डर घेण्यासाठी दरवाज्यावर बाहेर आला असताना उत्तराखंडमधील देहरादूनमध्ये त्याला अटक करण्यात आली.
कानपूरच्या अतिरिक्त पोलीस उपायुक्तअंजली विश्वकर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक आठवड्यांपासून पोलीस सोनीच्या डिजिटल हालचालींवर लक्ष ठेवून होते. दुबई, अमेरिका, मलेशियासह अनेक देशांतून त्याच्या विरोधात तक्रारी दाखल होत्या, पण तो सतत ठिकाणे बदलत होता. सोनीला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याची जुनी मोबाईल लोकेशन हिस्ट्री, त्याने वेगवेगळ्या बनावट नावांवर रजिस्टर केलेल्या ईमेल-आयडीचा मागोवा घेतला. पण त्याने फूड डिलिव्हरी ॲपमध्ये सेव्ह केलेला कायमचा पत्ता हा निर्णायक ठरला.
सोनी देहरादूनमध्ये लपून बसला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. ३० नोव्हेंबर रोजी त्याने रात्री जेवणासाठी फूड डिलिव्हरी ऑर्डर केली. जसा तो ऑर्डर घेण्यासाठी दरवाजावर बाहेर आला, तसा दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली.
रविंद्र नाथ सोनी आणि त्याचा ब्लूचिप ग्रुप लोकांना आकर्षित करण्यासाठी एक ठराविक पद्धत वापरत असे. त्याने गुंतवणूकदारांना ३६ ते ४६ महिन्यांत रक्कम दुप्पट करण्याचे आश्वासन दिले जात असे. बैठका घेऊन आणि दुबई-भारतातील योजना सांगत तो स्वतःला मोठा फायनान्स एक्सपर्ट असल्याचे सांगायचा. मात्र गुंतवणूक झाल्यावर तो कॉल उचलणे बंद करत असे, मीटिंग टाळत असे आणि तुमचा पैसा सुरक्षित आहे हेच वारंवार सांगत असे. जास्त दबाव आल्यास तो कंपनीची वेबसाइट बंद करायचा, सोशल मीडिया पेजेस आणि कंपनीचे नंबर बंद करून लगेच लोकेशन बदलत असे.
दिल्लीचे रहिवासी अब्दुल करीम यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी आधी ९ लाख आणि नंतर नवीन स्कीममध्ये ३२ लाख रुपये गुंतवले होते. कंपनीची वेबसाइट अचानक गायब झाल्यावर हा घोटाळा उघड झाला. मार्च २०२४ मध्ये जेव्हा कंपनीने पैसे देणे बंद केले आणि दुबईतील ऑफिस अचानक बंद असल्याचे कळले तेव्हा हा घोटाळा समोर आला. दुबईतील एका वृत्तानुसार, त्याने ९० लोकांकडून १७ मिलियन डॉलर (सुमारे १४० कोटी रुपये) हडपले होते. संपूर्ण घोटाळा ९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.
पोलिसांच्या तपासात, कंपनी बंद करण्यापूर्वी सोनीने कोट्यवधी रुपये क्रिप्टो वॉलेटमध्ये ट्रान्सफर केले होते. भारतात त्याच्या तीन मुख्य कंपन्या आणि १२ उपकंपन्या होत्या, ज्यातून तो पैशांची अफरातफर करत होता. पोलिसांनी त्याच्या जवळपास ८० लाख रुपयांची रक्कम गोठवली आहे.
आधीही झाली होती अटक
रविंद्र नाथ सोनी याला यापूर्वी २०१७ मध्ये अलीगढ पोलिसांनी फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने दुबईतील गुंतवणूकदारांना आपले लक्ष्य बनवले. सोनीने अटक टाळण्यासाठी केलेले सगळे स्मार्ट प्रयत्न त्याच्या एका चुकीमुळे फोल ठरले. त्याने फूड डिलिव्हरी ॲपमध्ये स्वतःचा खरा पत्ता कायम ठेवला होता, जो पोलिसांसाठी एक पुरावा ठरला. पोलिसांच्या पथकाने त्याच्याकडून मिळालेल्या जेवणाच्या ऑर्डरला ट्रॅक केले आणि ३० नोव्हेंबर रोजी त्याला अटक केली.
सध्या सोनी पोलीस कोठडीत असून, कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. पोलीस या आंतरराष्ट्रीय घोटाळ्याच्या मनी ट्रेलचा आणि इतर गुंतवणूकदारांचा शोध घेत आहेत. तो दुबईतून भारतात कसा आला, याचीही कसून चौकशी सुरू आहे.