भागीदारीतील वादातून क्लास चालकाचे अपहरण करुन मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 15:43 IST2018-11-27T15:30:25+5:302018-11-27T15:43:26+5:30
हडपसर परिसरातून पुणे-सोलापूर रस्त्यावरील यवत येथे नेण्यात आले.यवत परिसरातील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात नेण्यात आले.

भागीदारीतील वादातून क्लास चालकाचे अपहरण करुन मारहाण
पुणे : भागीदारीत सुरु केलेल्या शिकवणी व्यवसायात झालेल्या आर्थिक वादातून क्लास चालकाचे अपहरण करुन पाटबंधारे खात्याच्या विश्रामगृहावर नेऊन त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी भागीदार असलेल्या क्लास चालक महिलेच्या पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मुकेश कुमार (वय २९, रा. निर्मल टाऊनशिप, काळेपडळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २६ नोव्हेंबर रोजी घडली होती़. पोलिसांनी नवनाथ शेळके, शिवराज शेळके आणि त्यांच्या बरोबर असलेल्या तीन साथीदारां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेळके यांची पत्नी आणि मुकेश कुमार यांनी भागीदारीत हडपसर भागातील एका उच्चभ्रु सोसायटीत क्लास सुरु केला होता़. त्यात शेळके यांच्यासह अनेकांनी पैसे गुंतविले होते़. काही कारणाने हा क्लास बंद पडला़. या व्यवहारातील ३ लाख रुपये कुमार यांच्याकडे होते. ते पैसे कुमार देत नसल्याने शेळके आणि कुमार यांच्यात वाद सुरु होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कुमार यांना त्यांच्या घराजवळ शेळके आणि साथीदारांनी अडवले. त्यांना धमकावून मोटारीत बसवले. हडपसर परिसरातून पुणे-सोलापूर रस्त्यावरील यवत येथे नेण्यात आले.
यवत परिसरातील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात नेण्यात आले. तेथे डांबून ठेवून पट्टयाने मारहाण केली, असा आरोप कुमार यांनी फिर्यादीत केला आहे. शेळके पाटबंधारे विभागात अभियंता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कुमार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे तपास करत आहेत.