खुशीनेच अभिषेकच्या कुटुंबाला दिला आयुष्यभराचा घाव; गर्लफ्रेंडचं टॉर्चर सहन न झाल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:40 IST2025-11-18T13:38:35+5:302025-11-18T13:40:22+5:30
अभिषेक आणि खुशी अनेक वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. मात्र, खुशीच्या कुटुंबाला हे नाते मान्य नव्हते.

खुशीनेच अभिषेकच्या कुटुंबाला दिला आयुष्यभराचा घाव; गर्लफ्रेंडचं टॉर्चर सहन न झाल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
मध्य प्रदेशच्या इंदूरमधील शिवाजी नगर या भागात एका २२ वर्षीय तरुणाने गळफास घेत आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाचे नाव अभिषेक प्रजापत असे असून, आता त्याच्या कुटुंबाने काही धक्कादायक आरोप केले आहेत. अभिषेकच्या कुटुंबाला सुरुवातीपासूनच या प्रकरणात वेगळाच संशय येत होता. कुटुंबाने या प्रकरणी आणखी तपास करण्यात यावा अशी मागणी केली होती. या दरम्यानच आता एक असा व्हिडीओ समोर आला आहे, ज्याने संपूर्ण घटनेला एक वेगळे वळण दिले आहे.
सध्या समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये अभिषेकची गर्लफ्रेंड देखील दिसली आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेकची गर्लफ्रेंड खुशी फाशीचा दोर स्वतःच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर ती तलवार कधी आपल्या मानेवर तर कधी पोटावर ठेवून अभिषेकला धमकी देताना दिसत आहे. 'तू मला सोडलंस तर मी माझा जीव देईन', अशी धमकी ती अभिषेकला देत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
आत्महत्येच्या वेळी अभिषेक ज्या तरुणीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होता, तिचे नाव खुशी आहे. अभिषेकच्या कुटुंबीयांनी म्हटले की, अभिषेक आणि खुशी अनेक वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. मात्र, खुशीच्या कुटुंबाला हे नाते मान्य नव्हते. अभिषेकचे वडील रामहित प्रजापत यांनी गंभीर आरोप केले आहेत की, खुशी आणि तिच्या कुटुंबीयांनीच अभिषेकला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले. त्यांनी अनेकवेळा अभिषेकला मारहाण करून नाते तोडण्यास भाग पाडले होते.
सततचा मानसिक दबाव
अभिषेकच्या कुटुंबीयांनी सांगितले की, खुशी वारंवार व्हिडीओ कॉलवर फास, तलवार किंवा स्वतःला इजा पोहोचवण्याचे नाटक करून अभिषेकवर दबाव आणायची. या सततच्या मानसिक त्रासामुळे अभिषेक तणावात राहायचा. अभिषेकच्या वडिलांनी पुढे आरोप केला की, काही महिन्यांपूर्वी खुशीच्या कुटुंबाने खोटी तक्रार दाखल केली होती, ज्यामुळे भागीरथपुरा चौकीत अभिषेकला अटक करून ठेवण्यात आले होते. खूप प्रयत्नांनंतर अभिषेकची सुटका झाली, पण पोलिसांनीही त्याला खुशीपासून दूर राहण्यास सांगितले होते. सततच्या धमक्या, मारहाण आणि ब्लॅकमेलिंगमुळे अभिषेक आतून पूर्णपणे खचला होता.
तपासणीसाठी मोबाईल जप्त
१४ नोव्हेंबरच्या संध्याकाळी अभिषेकच्या धाकट्या बहिणीने त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले आणि तिने आरडाओरडा करून वडिलांना बोलावले. अभिषेक कुटुंबाचा आधार होता; त्याचे वडील नाश्त्याचा स्टॉल चालवतात, तर कुटुंबात दोन बहिणी आणि एक लहान भाऊ आहे. घटनेनंतर पोलिसांनी अभिषेकचा मोबाईल जप्त केला आहे. कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, आत्महत्येच्या काही मिनिटे आधीपर्यंत तो खुशीशी बोलत होता. यामुळे त्याचा मोबाईल, चॅट, कॉल रेकॉर्ड आणि व्हिडीओ आता तपासाचा सर्वात महत्त्वाचा भाग बनले आहेत.
अतिरिक्त डीसीपी राजेश दंडोतिया यांनी सांगितले की, व्हायरल झालेल्या व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल आणि सर्व बाजूंनी सखोल चौकशी सुरू आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईची दिशा निश्चित केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.