तू तिच्या गाडीला अपघात कर, मी तिला वाचवतो...; तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन, सफलही झाला पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 08:05 IST2026-01-09T08:04:50+5:302026-01-09T08:05:15+5:30
Pathanamthitta Fake Accident Case केरळमधील पतनमथिट्टा येथे एका तरुणाने प्रेयसीला प्रभावित करण्यासाठी अपघाताचा खोटा बनाव रचला. पोलिसांनी आरोपी रंजित आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. वाचा सविस्तर धक्कादायक बातमी.

तू तिच्या गाडीला अपघात कर, मी तिला वाचवतो...; तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन, सफलही झाला पण...
एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटाला शोभेल असा एक धक्कादायक प्रकार केरळमधील पतनमथिट्टा जिल्ह्यात समोर आला आहे. आपल्या प्रेयसीच्या नजरेत 'हिरो' ठरण्यासाठी एका तरुणाने आपल्या मित्राच्या मदतीने चक्क तिच्या अपघाताचा बनाव रचला. त्यात सफलही झाला. परंतू, काही दिवसांनी तिला संशय आल्याने हा सगळा बनाव उघड झाला असून पोलिसांनी प्रियकरासह त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत.
मुख्य आरोपी रंजित राजन (२४) याचे एका तरुणीवर प्रेम होते. तरुणीचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने योजना आखली. त्याने आपल्या मित्राला (अजास, १९) तरुणीच्या स्कूटरला धडक देण्यास सांगितले. २३ डिसेंबर रोजी तरुणी कामावरून घरी जात असताना, अजासने त्याच्या कारने तरुणीच्या स्कूटरला जोरात धडक दिली आणि तो तिथून पसार झाला.
'रेस्क्यूअर' बनून मारली एन्ट्री
अपघात घडल्यानंतर काही क्षणातच रंजित दुसऱ्या कारमधून तिथे पोहोचला. जणू काही अपघाताशी त्याचा संबंधच नाही, अशा आविर्भावात त्याने जखमी तरुणीला तातडीने रुग्णालयात नेले. स्थानिक लोक जमा झाले असता, त्याने स्वतःची ओळख तरुणीचा पती म्हणून करून दिली आणि तिला वाचविल्याचे दाखवत रुग्णालयात घेऊन गेला. एका क्षणात रंजित तिच्या मनात हिरो झाला. पुढे भेटी, बोलणे सारे होऊ लागले. परंतू, या अपघातात तिचा उजवा हात मोडला आणि बोटांनाही फ्रॅक्चर झाले होते.
काही दिवसांनी तरुणीच्या डोळ्यावरून रंजितच्या हिरोगिरीची धुंद उतरू लागली. अपघात झाल्यानंतर रंजित इतक्या कमी वेळात घटनास्थळी कसा पोहोचला, यावर तिला संशय आला. तिने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींचे कॉल डिटेल्स तपासले. तपासात असे दिसून आले की, अपघात करणारा अजास आणि मदत करणारा रंजित हे एकमेकांच्या संपर्कात होते. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी प्रेयसीला प्रभावित करण्यासाठी आणि लग्नासाठी संमती मिळवण्यासाठी हा कट रचल्याची कबुली दिली.
दोन्ही आरोपींवर आता खुनाचा प्रयत्न आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे.