किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:48 IST2025-12-17T12:46:51+5:302025-12-17T12:48:16+5:30
रमेश चंद्र आणि त्यांची पत्नी नीलम ७० दिवसांपर्यंत 'डिजिटल अरेस्ट'च्या भयानक जाळ्यात अडकले होते.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडचे निवृत्त सुपरिटेंडिंग इंजिनिअर रमेश चंद्र आणि त्यांची पत्नी नीलम ७० दिवसांपर्यंत 'डिजिटल अरेस्ट'च्या भयानक जाळ्यात अडकले होते. सायबर गुन्हेगारांनी सीबीआय अधिकारी बनून आणि मुलांच्या जीवाची भीती दाखवून कानपूरच्या या दाम्पत्याची आयुष्यभराची ५३ लाख रुपयांची कमाई लुटली. आता परिस्थिती अशी आहे की, दोन्ही किडन्या फेल झाल्यामुळे वेदनेने तडफणाऱ्या रमेश चंद्र यांच्याकडे स्वतःच्या डायलिसिससाठीही पैसे उरले नाहीत.
दाम्पत्याला त्यांच्याच घराच्या एका खोलीत कैद करण्यात आलं होतं. गुन्हेगारांनी त्यांना आदेश दिला होता की, मोबाईल बेडसमोरील खुर्चीवर ठेवून व्हिडीओ कॉल सतत सुरू ठेवायचा. या काळात टीव्ही पाहणं, कोणाशी बोलणं किंवा दुसऱ्या खोलीत जाण्यासही मनाई होती. अगदी स्वयंपाकघरात किंवा वॉशरूमला जाण्यासाठीही परवानगी घ्यावी लागत असे. सलग ५ दिवस त्यांनी मोलकरणीलाही घरात येऊ दिलं नाही. हे ठग अस्खलित इंग्रजी बोलत होते आणि स्वतःला सीबीआय व सर्व्हिलान्स अधिकारी असल्याचं सांगत होते.
पैसे संपले, आता कसे होणार उपचार?
'आजतक'शी बोलताना रमेश चंद्र यांना रडू कोसळलं. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या असून आठवड्यातून दोनदा डायलिसिस करावं लागतं. फसवणुकीनंतर त्यांच्याकडे केवळ १४ हजार रुपये शिल्लक होते, त्यापैकी ३ हजार रुपये आज डायलिसिसवर खर्च झाले. आता खात्यात फक्त ११ हजार रुपये उरले आहेत. त्यांची पत्नी नीलम यांनी रडत सांगितलं की, मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी कधी स्वतःचं घरही खरेदी केले नाही, मात्र ठगांनी त्यांची संपूर्ण जमापुंजी लुटली.
मुलांच्या जीवाची भीती दाखवून लुटले पैसे
रमेश चंद्र यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत कधीही लाच घेतली नव्हती. तरी त्यांना घाबरवलं की, त्यांच्या खात्यातून ५३८ कोटी रुपयांचे अवैध व्यवहार झाले आहेत. जेव्हा हे दाम्पत्य बँकेत पैसे काढायला जायचे, तेव्हा ठग व्हिडीओ कॉल आणि व्हॉट्सएप चॅटद्वारे त्यांच्यावर नजर ठेवायचे. जर कोणाला काही सांगितलं, तर अमेरिकेत शिकणाऱ्या मोठ्या मुलाचे आणि नोएडामध्ये शिकणाऱ्या लहान मुलाचं भविष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देण्यात आली होती. याच भीतीपोटी ते ७० दिवस गप्प राहिले.
ट्रान्सफर केले ५३ लाख
रमेश चंद्र यांचा विश्वास संपादन करण्यासाठी ठगांनी त्यांना व्हिडीओ कॉलवर सुप्रीम कोर्टाची बनावट सुनावणी दाखवली, ज्यामुळे तिथले वातावरण हुबेहूब न्यायालयासारखे वाटलं. संतोष, ए. अनंतराम आणि उमेश मच्छंदर अशी बनावट नावं सांगितली होती. निर्दोष सिद्ध झाल्यावर सुप्रीम कोर्ट तुमचे पैसे परत करेल, असं आमिष त्यांनी दाखवलं. या जाळ्यात अडकून दाम्पत्याने ३ ऑक्टोबरला २१ लाख आणि २० नोव्हेंबरला २३ लाख रुपयांसह एकूण ५३ लाख रुपये वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये ट्रान्सफर केले.