८ जणांचा जीव घेणारा कमरुद्दीन जाळ्यात; १७ फुटांच्या भिंतीवरुन उडी, हिंदू भाविक टार्गेटवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 15:38 IST2026-02-13T15:28:51+5:302026-02-13T15:38:31+5:30
दिल्लीत तिघांची हत्या करणाऱ्या कमरुद्दीनबाबत हादरवणारे खुलासे समोर आले आहेत.

८ जणांचा जीव घेणारा कमरुद्दीन जाळ्यात; १७ फुटांच्या भिंतीवरुन उडी, हिंदू भाविक टार्गेटवर
Delhi kamruddin Baba: दिल्लीतील पीरागढी परिसरात एका कारमध्ये सापडलेल्या तीन मृतदेहांच्या प्रकरणाचा छडा लावताना दिल्लीपोलिसांनी आणखी एका प्रकरणाचा खुलासा केला आहे. स्वतःला मौलाना आणि तांत्रिक म्हणवून घेणारा बाबा कमरुद्दीन याला पोलिसांनी अटक केली असून, त्याने आतापर्यंत तब्बल ८ लोकांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. तंत्र-मंत्र, पैशांचा पाऊन आणि जिन्नच्या नावाखाली त्याने केलेल्या काळ्या कृत्यांनी संपूर्ण देश हादरला आहे.
काही दिवसांपूर्वी पीरागढी उड्डाणपुलाजवळ रणधीर, शिव नरेश आणि लक्ष्मी देवी हे तिघे एका कारमध्ये मृतावस्थेत आढळले होते. तपासात, आरोपी कमरुद्दीन याने या तिघांना सल्फास आणि झोपेच्या गोळ्या मिसळलेले लाडू खायला दिले होते आणि वरून कोल्ड ड्रिंक पाजले होते. हे मिश्रण इतके घातक होते की, विषबाधा झाल्यावर पीडितांना गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. धक्कादायक म्हणजे, हत्येच्या एक दिवस आधीही हे तिघे बाबाला भेटायला गेले होते, पण त्यांच्याकडे २ लाख रुपये नसल्यामुळे बाबाने त्यांना परत पाठवले आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण नियोजनाने त्यांचा काटा काढला.
अंधश्रद्धेचा बाजार आणि लैंगिक शोषणाचे जाळे
तपासादरम्यान लक्ष्मी नावाच्या महिलेच्या फोनमध्ये अनेक मुलींचे फोटो सापडले आहेत, ज्यात त्या मुली विविध यंत्र-तंत्रांसह दिसत आहेत. कमरुद्दीन मुलींना आणि महिलांना जिन्न येईल आणि त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवेल, त्यानंतर पैशांचा पाऊस पडेल, असे आमिष दाखवून फसवत होता. पैशांचा पाऊस पडेल या आमिषाने अनेक मुली त्याच्या संपर्कात होत्या. पोलीस आता अशा महिलांचा शोध घेत आहेत ज्यांचे या बाबाने लैंगिक शोषण केले असण्याची दाट शक्यता आहे.
१७ फूट भिंत ओलांडून पळण्याचा प्रयत्न
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बाबाच्या घराचे लोकेशन शोधून काढले. जेव्हा पोलिसांटे पथक त्याच्या घरी पोहोचले, तेव्हा त्याने सुरुवातीला मुले आजारी असल्याचे सांगून दरवाजा उघडण्यास नकार दिला. काही वेळातच त्याने पोलिसांना चकवा देण्यासाठी १७ फूट उंच भिंत ओलांडून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडलं.
सिंदूर वापरून शस्त्रक्रियेचा बनाव आणि लूट
कमरुद्दीन एका भेटीसाठी ७ हजार रुपये फी वसूल करायचा. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी तो भयंकर हातचलाखी करायचा. एका प्रकरणात त्याने एका व्यक्तीच्या पोटातून शस्त्रक्रियेशिवाय किडनी स्टोन काढल्याचा बनाव केला. त्याने हात पोटात ठेवल्यावर रक्त दाखवले होते. पण पोलिसांनी जेव्हा त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा ते रक्त नसून हाताला लावलेले सिंदूर असल्याचे उघड झाले. पोलिसांना त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात सिंदूर आणि इतर साहित्य मिळाले आहे.
हिंदू भाविक होते निशाण्यावर
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कमरुद्दीनच्या निशाण्यावर प्रामुख्याने हिंदू लोक असायचे. आतापर्यंत त्याने ज्या ८ लोकांच्या हत्येची कबुली दिली आहे, ते सर्व हिंदू होते. तंत्र-मंत्राची भीती घालून तो लोकांचे फोन फ्लाइट मोडवर ठेवायला सांगायचा, जेणेकरून कोणत्याही कृत्याची रेकॉर्डिंग होऊ शकणार नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे प्रचंड मालमत्ता असून त्याच्या गुन्ह्यांचे जाळे दिल्लीपासून फिरोजाबादपर्यंत पसरलेले असण्याची शक्यता आहे. सध्या पोलीस त्याला घेऊन विविध ठिकाणी रिकव्हरीसाठी जात असून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.