आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 19:29 IST2025-08-26T19:28:26+5:302025-08-26T19:29:18+5:30
हुंड्याच्या छळाला कंटाळून एका शिक्षिकेने तिच्या निष्पाप मुलीसह आत्महत्या केली.

आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
राजस्थानातील जोधपूरमध्ये ग्रेटर नोएडासारखी हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. हुंड्याच्या छळाला कंटाळून एका शिक्षिकेने तिच्या निष्पाप मुलीसह आत्महत्या केली. संजू बिश्नोई असं शिक्षिकेचं नाव आहे. तिने तिच्या तीन वर्षांच्या मुलीला कुशीत घेतलं आणि स्वतःवर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतलं. मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर संजूचा रुग्णालयात मृत्यू झाला.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. महिलेने स्वतःला आणि तिच्या मुलीला पेटवून घेतलं, तेव्हा तिचा पती दिलीप बिश्नोई घरी नव्हता. अचानक धूर येत असलेला पाहून शेजारी घाबरले आणि त्यांनी तात्काळ महिलेच्या वडिलांना फोन केला. कुटुंब घरी पोहोचताच त्यांना संजू जळत असलेली दिसली. मुलीचा त्यांच्या डोळ्यासमोर मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
मंदोरचे एसीपी नागेंद्र कुमार यांनी सांगितलं की, मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर महिलेचा शनिवारी जोधपूर येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या वडिलांनी रविवारी स्थानिक पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यात स्पष्टपणे आरोप करण्यात आला आहे की, मुलीचा हुंड्यासाठी सतत छळ केला जात होता. यामुळे कंटाळून त्यांच्या मुलीने आत्महत्या केली.
संजूच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिचा पती दिलीप बिश्नोई, सासू, सासरे आणि दीर यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. कुटुंबाने असाही आरोप केला आहे की, सासरच्यांनी मिळून संजूला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं. घटनास्थळावरून पोलिसांनी एक चिठ्ठी देखील जप्त केली. या चिठ्ठीत संजूने तिच्या सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
मोबाईल जप्त करण्यात आला आहे आणि तो तपासासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. मोबाईलमधून महत्त्वाची माहिती बाहेर येण्याची अपेक्षा आहे. असं सांगितले जात आहे की संजू बिश्नोई ही २०२१ पासून एका सरकारी माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. १० वर्षांपूर्वी तिचं लग्न दिलीप बिश्नोई याच्याशी झालं होतं. तेव्हापासून तिचा पती आणि सासरचे लोक तिला त्रास देत होते.
गेल्या काही काळापासून सासरच्यांशी होणारे वाद खूप वाढले होते. शनिवारीही त्यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे संजू खूप संतापली आणि दुःखी होती. शाळेतून परतल्यानंतर तिने तिच्या मुलीला कुशीत घेतलं आणि स्वतःवर पेट्रोल टाकून पेटवून घेतलं. तिच्या मृतदेहाचं महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.