"नमस्कार केला नाही?"; काँग्रेस नेत्याच्या मुलाने 17 वर्षीय मुलाला बेदम मारहाण केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 16:10 IST2023-08-29T16:02:04+5:302023-08-29T16:10:05+5:30
मारहाणीत मुलगा जखमी झाला आहे. यानंतरही काँग्रेस नेत्याच्या मुलाचे समाधान न झाल्याने त्याने जबरदस्तीने त्याला वाहनात बसवून पळवून नेलं.

"नमस्कार केला नाही?"; काँग्रेस नेत्याच्या मुलाने 17 वर्षीय मुलाला बेदम मारहाण केल्याचा आरोप
झारखंडमधील धनबादमध्ये एका 17 वर्षीय मुलाला काँग्रेस नेत्याच्या मुलाने मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. धनबादमध्ये काँग्रेस नेते रणविजय सिंह यांचा मुलगा रणवीर सिंह याने एका विद्यार्थ्याने त्याला नमस्कार न केल्याने मारहाण केली. काँग्रेस नेत्याच्या मुलाने त्याच्या मित्रांसह आणि खासगी बॉ़डीगार्डसह मुलाला लाथा-बुक्क्यांनी आणि हॉकी स्टिकने मारहाण केली.
मारहाणीत मुलगा जखमी झाला आहे. यानंतरही काँग्रेस नेत्याच्या मुलाचे समाधान न झाल्याने त्याने जबरदस्तीने त्याला वाहनात बसवून पळवून नेलं. यानंतर विद्यार्थ्याच्या वडिलांना फोन करून धमकी देण्यात आली. विद्यार्थ्याच्या वडिलांनी काँग्रेस नेत्याचा मुलगा आणि इतरांविरुद्ध सरायदेला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
काँग्रेस नेत्याच्या मुलाला नमस्कार न केल्यामुळेच त्याने मारहाण केल्याचं मुलाने सांगितलं. पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलाला काँग्रेस नेते रणविजय सिंह यांच्या मुलाने मारहाण केली. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. रणवीर सिंह आणि इतर तिघांविरुद्ध सरायदेला पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
त्याचवेळी या प्रकरणी काँग्रेस नेते रणविजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो त्यांचा मुलगा असल्याचे कुठेही स्पष्ट झालेले नाही. व्हिडिओमध्ये कोणतीही सत्यता नाही. व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी व्हायला हवी. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.