“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 17:47 IST2025-12-12T17:46:30+5:302025-12-12T17:47:08+5:30
मोनिकाचं लग्न २०२० मध्ये शिवम दुबेसोबत झालं होतं. ती चार वर्षांच्या ओम नावाच्या मुलासोबत सासरी राहत होती.

फोटो - आजतक
झाशी येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरगुती वादामुळे २५ वर्षीय मोनिकाचा मृत्यू झाला आहे. शहर कोतवाली क्षेत्रात राहणाऱ्या मोनिकाचं लग्न २०२० मध्ये शिवम दुबेसोबत झालं होतं. ती चार वर्षांच्या ओम नावाच्या मुलासोबत सासरी राहत होती.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, खर्च आणि मुलाच्या शाळेच्या फीवरून पती शिवम आणि मोनिका यांच्यात अनेकदा वाद होत असे. मोनिकाची वहिनी कोमल पांडे यांनी सांगितलं की, शिवम दोन महिन्यांपासून बंगळुरूमध्ये होता आणि तीन दिवसांपूर्वीच घरी परतला होता. मंगळवारी रात्री दोघांमध्ये पैशांवरून भांडण झालं होतं.
बुधवारी सकाळी पुन्हा वाद वाढला. व्हिडिओ कॉलदरम्यान मोनिका नणंदेने मारलेल्या धक्क्यामुळे खाली पडताना दिसली. यानंतर पती, सासू आणि नणंदेने तिला मारहाण केली. कोमलने फोनवरून भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला, पण फोन कट करण्यात आला. थोड्या वेळाने शिवमने फोन करून सांगितलं की, मोनिकाने विष घेतलं आणि तिला त्वरित रुग्णालयात नेण्यात आलं नाही.
दुपारी ४ वाजेच्या सुमारास तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं, जिथे तिची प्रकृती गंभीर होती. गुरुवारी सकाळी माहेरकडील लोक पोहोचले तेव्हा त्यांना दिसलं की मोनिकाचा मृतदेह घराबाहेर ठेवला होता आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. माहेरच्या लोकांच्या विरोधामुळे पोलिसांनी अंत्यसंस्कार थांबवले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
मोनिकाचा ४ वर्षांचा मुलगा ओम याने रडत रडत सांगितलं की, "बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं होतं." त्याने स्वतः भांडणाचे फोटो काढले होते. शहर कोतवालीचे प्रभारी विद्यासागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांकडून तक्रार मिळाल्यावर पुढील कारवाई केली जाईल. सध्या शवविच्छेदन रिपोर्टची वाट पाहत आहे.