पोलिसांनी घडवली अद्दल! सहज गमंत म्हणून 'त्यानं' ११२ नंबरवर कॉल केला, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 04:56 PM2022-01-22T16:56:56+5:302022-01-22T16:57:39+5:30

शासनाने १०० नंबर बंद करून ११२ हा टोल फ्री नंबर सुरू केला. त्यासाठी स्वतंत्र पोलीस आणि वाहने तैनात केली आहेत.

Jalgoan Police arrested the accused for making a fake call | पोलिसांनी घडवली अद्दल! सहज गमंत म्हणून 'त्यानं' ११२ नंबरवर कॉल केला, मग...

पोलिसांनी घडवली अद्दल! सहज गमंत म्हणून 'त्यानं' ११२ नंबरवर कॉल केला, मग...

Next

जळगाव - ११२ हा पोलीस नियंत्रण कक्षाचा टोल फ्री नंबर... यावर संपर्क करून आपात्कालीन परिस्थितीत पोलिसांची मदत घेता येते. पण त्याचा दुरुपयोग केला तर काय होऊ शकते, याचा प्रत्यय देणारी एक घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील डांगर गावात घडलीये. पोलिसांना ११२ नंबर डायल करून खोट्या भांडणाची माहिती देणाऱ्या अमळनेर तालुक्यातील डांगर येथील एका इसमास चांगलेच महाग पडले आहे. पोलिसांचा वेळ वाया घालवून दिशाभूल केल्याने त्याला लॉकअपची हवा खायला लागली.

आधी नागरिकांच्या मदतीसाठी १०० नंबर देण्यात आला होता. मात्र, लहान मुले, दारुडे आणि समाजकंटकांमुळे ठाणे अंमलदाराला त्रास व्हायचा. म्हणून शासनाने १०० नंबर बंद करून ११२ हा टोल फ्री नंबर सुरू केला. त्यासाठी स्वतंत्र पोलीस आणि वाहने तैनात केली आहेत. तेथेही काहींनी मजाक सुरू केली आणि त्याला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. अमळनेर तालुक्यातील डांगर येथील धनराज कडू भिल याने २२ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ११२ नंबरवर कॉल करून गावात वाद होत असल्याची तक्रार केली. तात्काळ मदतीची मागणी त्याने केली. नियंत्रण कक्षाकडून ११२ च्या कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी मिलिंद भामरे व सूर्यकांत साळुंखे यांना घटनेची माहिती देण्यात आली. ताबडतोब मदतीची सूचना मिळाल्याने भामरे व साळुंखे आणि चालक घटनास्थळी डांगर येथे पोहचले. तर तेथे उभ्या असलेल्या धनराज याने मी सहज मजाक मजाकमध्ये ११२ ला कॉल केला. भांडण वगैरे नाही. पोलीस खरंच मदतीला येतात की नाही हे पाहत होतो, असे सांगितले. त्यावेळी त्याच्या तोंडाचा दारूचा उग्र वास येत होता. पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने आरडाओरडा सुरू केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना हकीकत सांगितल्यानंतर त्याच्यावर भादंवि कलम १८२ आणि दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकंदरीत पोलिसांशी केलेली मजाक धनराजला चांगलीच भोवली आहे.

११२ हा नंबर जनतेच्या सेवेसाठी, तात्काळ मदतीसाठी आहे. त्यामुळे गरजेच्या वेळीच त्याचा सदुपयोग करा. गंमत केल्यास कायद्याच्या त्रासाला सामोरे जावे लागेल, असा इशारा या घटनेच्या निमित्ताने पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिलाय.

Web Title: Jalgoan Police arrested the accused for making a fake call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव