कामाच्या बहाण्याने बोलावलं अन् संपवलं! किरकोळ वादातून मित्राचीच हत्या; मृतदेह पोत्यात भरून धरणात फेकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 20:32 IST2025-12-20T20:29:30+5:302025-12-20T20:32:30+5:30

जळगावात जुन्या वादाची खुन्नस ठेवून फायनान्स कर्मचाऱ्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jalgaon finance company employee was murdered his body was tied in a sack and thrown into a dam | कामाच्या बहाण्याने बोलावलं अन् संपवलं! किरकोळ वादातून मित्राचीच हत्या; मृतदेह पोत्यात भरून धरणात फेकला

कामाच्या बहाण्याने बोलावलं अन् संपवलं! किरकोळ वादातून मित्राचीच हत्या; मृतदेह पोत्यात भरून धरणात फेकला

Jalgaon Crime: जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. एका फायनान्स कंपनीत एकत्र काम करणाऱ्या मित्रांमधील जुन्या वादाचे पर्यावसान हत्येत झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जामनेर येथील रहिवासी असलेल्या नीलेश राजेंद्र कासार (वय २७) या तरुणाची त्याच्याच दोन मित्रांनी निर्घृण हत्या केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात बांधून धरणात फेकून दिला होता. एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे या गुन्ह्याचा छडा लावत दोन संशयितांना गुजरातधून बेड्या ठोकल्या आहेत.

मयत नीलेश कासार हा जळगावमधील एका फायनान्स कंपनीत कार्यरत होता. त्याचे सहकारी दिनेश चौधरी (वय २०) आणि माजी सहकारी भूषण पाटील (वय २०) यांच्याशी नीलेशची जुनी मैत्री होती. मात्र, भूषण आणि नीलेश यांच्यात काही महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. भूषणने या भांडणाची मनात खुन्नस धरली होती आणि नीलेशचा काटा काढण्याचे ठरवले.

कामाचे निमित्त करून रचला मृत्यूचा सापळा

१५ डिसेंबर रोजी भूषणने एका फायनान्स फाईलच्या मंजुरीवर चर्चा करायची आहे, असे सांगून नीलेशला शिरसोली येथे बोलावून घेतले. नीलेश आपल्या दुचाकीने तेथे गेला असता, भूषण आणि दिनेशने त्याच्याशी पुन्हा जुना वाद उकरून काढला. या वादातून दोघांनी नीलेशचा गळा आवळून त्याला जिवे मारले. यानंतर त्यांनी मृतदेह एका पोत्यात भरला आणि रामदेववाडी परिसरातील जंगलात असलेल्या नेव्हरे धरणाच्या पाण्यात फेकून दिला.

असा लागला गुन्ह्याचा छडा
नीलेश घरी न परतल्याने कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. तपासादरम्यान पोलिसांना रामदेववाडी परिसरात नीलेशची दुचाकी बेवारस स्थितीत सापडली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तांत्रिक तपास करत कॉल डिटेल्स तपासले, ज्यात नीलेशचे शेवटचे बोलणे दिनेश आणि भूषणशी झाल्याचे निष्पन्न झाले. संशयित आरोपींचे मोबाईल बंद असल्याने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचे लोकेशन शोधले आणि गुजरातमध्ये धाड टाकून दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी खुनाची कबुली दिली आणि मृतदेह कुठे टाकला याची माहिती दिली.

धरणातून कुजलेल्या स्थितीत मृतदेह बाहेर

शुक्रवारी सकाळी पोलिसांनी नेव्हरे धरणात शोधमोहीम राबवली. सुमारे चार दिवसांपासून पाण्यात असल्याने नीलेशचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, निरीक्षक बबन आव्हाड आणि सहाय्यक निरीक्षक अनिल वाघ यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

जामनेरमध्ये शोककळा

नीलेश हा जामनेर येथील प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी राजेंद्र कासार यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी जामनेरमधील दत्त चैतन्य नगर येथील निवासस्थानी आणण्यात आला. नीलेशच्या निधनाने त्याच्या वृद्ध आई-वडिलांना आणि बहिणीला मोठा धक्का बसला आहे. परिसरात अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Jalgaon finance company employee was murdered his body was tied in a sack and thrown into a dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.