Jailed for Five year for pocso offence | पॉस्कोच्या गुन्ह्यात आरोपीला पाच वर्षांची शिक्षा
पॉस्कोच्या गुन्ह्यात आरोपीला पाच वर्षांची शिक्षा

ठळक मुद्दे२२ हजार रुपये दंडही ठोठवण्यात आला असून दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे. या एकाच महिन्यात आकोटकर यांनी बाजू मांडलेल्या तीन प्रकरणात आरोपींना शिक्षा झालेली आहे.

अकोला - अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तीला शिवीगाळ केल्याप्रकरणी एका २६ वर्षीय आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनीका आर्लेंड यांच्या न्यायालयाने गुरुवारी पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. यासोबतच २२ हजार रुपये दंडही ठोठवण्यात आला असून दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.

आकोट फैलमधील एक अल्पवयीन मुलगी तीच्या घरी झोपलेली असताना विकास महादेव गायकवाड रा. अकोला हा आरोपी तिच्या घरात घुसला, त्यानंतर मुलीचा विनयभंग करून शिवीगाळ केली. मुलीने विरोध केल्यानंतर आरोपी घरातून पळून गेला. त्यानंतर मुलीच्या तक्रारीवरुन आकोट फैल पोलिसांनी आरोपी विकास गायकवाड याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४, ४५२, ५०४ तसेच पॉस्को कायद्याच्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास आकोट फैल पोलिसांनी करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने या प्रकरणी सहा साक्षीदार तपासले. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनीका आर्लेड यांच्या न्यायालयाने आरोपीस कलम ४५२ अन्वये दोषी ठरवीत ५ वर्षांची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने आणखी शिक्षा,  कलम ५०४ अन्वये २ वर्षांची शिक्षा तसेच दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना आणखी शिक्षा तसेच पॉस्को कायद्याच्या कलम ८ अन्वये  ५ वर्षांची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने आणखी शिक्षा न्यायालयाने ठोठावली. या तीनही शिक्षा आरोपीला सोबत भोगायच्या आहेत. या प्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. राजेश आकोटकर यांनी कामकाज पाहीले. या एकाच महिन्यात आकोटकर यांनी बाजू मांडलेल्या तीन प्रकरणात आरोपींना शिक्षा झालेली आहे.

Web Title: Jailed for Five year for pocso offence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.