शेजाऱ्यांच्या त्रासाने आयटी अभियंत्याचे आयुष्य हिरावले; बांधकाम सुरू असलेल्या स्वतःच्या घरातच जीवनयात्रा संपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 14:08 IST2025-12-04T14:04:04+5:302025-12-04T14:08:14+5:30
बंगळुरुमध्ये एका आयटी कर्मचाऱ्याने शेजारच्यांच्या त्रासाला कंटाळून स्वतःला संपवले.

शेजाऱ्यांच्या त्रासाने आयटी अभियंत्याचे आयुष्य हिरावले; बांधकाम सुरू असलेल्या स्वतःच्या घरातच जीवनयात्रा संपली
Bengaluru Crime: बंगळुरूमधील नल्लूरहळ्ळी परिसरातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. शेजाऱ्यांकडून होणारा असह्य जाच, मालमत्तेच्या वादातून प्रशासनाने पाठवलेली नोटीस आणि कथितपणे केलेली २० लाखांची मागणी पूर्ण करू न शकल्याने एका आयटी अभियंत्याने स्वतःला संपवले. मुरली गोविंदराजु या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्याने स्वतःच्याच स्वप्नातील घरात गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह त्यांच्या बांधकाम सुरू असलेल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर आढळला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
दहा पानी सुसाईड नोट आणि गंभीर आरोप
आत्महत्या करण्यापूर्वी आयटीपीएलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले मुरली यांनी १० पानी सुसाईड नोट लिहिली आहे. या चिठ्ठीत त्यांनी शेजारी कुटुंब आणि काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शेजारी असलेल्या नांबियार कुटुंबाकडून (शशी नांबियार आणि उषा नांबियार) त्यांना सतत त्रास दिला जात होता, तसेच बांधकाम थांबवण्यासाठी २० लाख रुपयांची खंडणी मागितली जात होती, असा दावा त्यांनी केला आहे. मुरली यांच्या आई, लक्ष्मी गोविंदराजु यांनीही तक्रारीत म्हटले की, त्यांच्या मुलाला वारंवार छळले जात होते आणि धमक्या दिल्या जात होत्या. हा आर्थिक आणि मानसिक ताण असह्य झाल्यानेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
तणाव, नोटीस आणि अखेरचा दिवस
मुरली यांनी २०१८ मध्ये नांबियार यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून ४०x६० चौरस फुटांचा भूखंड विकत घेतला होता. बांधकाम सुरू होताच त्यांच्यातील संबंध बिघडले. उषा आणि शशी नांबियार यांनी बांधकाम नियमांचे उल्लंघन केल्याचे वारंवार आरोप करून मुरली यांना त्रास देण्यास सुरुवात केली. मुरली यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यावर, उषा यांनी बीबीएमपी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. त्यानंतर अधिकारी वारंवार बांधकामस्थळी येऊन त्यांना त्रास देत असत.
बुधवारी सकाळी या प्रकरणात अधिकाऱ्यांसमोर मुरली यांची हजेरी होती. यापूर्वीच सकाळी ६ वाजताच्या सुमारास मुरली कुटुंबीयांना मी खूप दबावाखाली आहे आणि उषा-शशी त्रास देत आहेत, असे सांगून घरातून बाहेर पडले आणि त्यांनी बांधकाम सुरू असलेल्या घरात जीवन संपवले.
पोलिसांनी मुरली यांच्या आईच्या तक्रारीवरून तत्काळ कारवाई करत शेजारी शशी नांबियार (६४) आणि उषा नांबियार (५७) यांना अटक केली आहे. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, तर त्यांचा मुलगा वरुण याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, नांबियार दाम्पत्याने २०१८ पासून अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या, ज्यामुळे मुरली यांना बी बीबीएमपी कार्यालये, पोलिस ठाणे आणि स्थानिक न्यायालयांमध्ये चकरा माराव्या लागत होत्या.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांबियार कुटुंब फक्त मुरली यांनाच नाही, तर परिसरातील इतर अनेक रहिवाशांनाही सामाजिक कार्यकर्ते असल्याच्या नावाखाली तक्रारी करून खंडणी मागत होते. पोलिसांनी परिसरातील सर्व पीडित नागरिकांना पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे. दोन लहान मुलींचे वडील असलेल्या या तंत्रज्ञाचा स्वप्नपूर्तीचा प्रवास शेजाऱ्यांच्या छळामुळे दुर्दैवी वळणावर थांबला.