इन्स्टाग्रामवरची ओळख प्रेमापर्यंत पोहोचली; २० वर्षांच्या तरुणाचा हात धरून ४ मुलांची आई पळाली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 16:56 IST2026-02-05T16:55:21+5:302026-02-05T16:56:43+5:30
इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर चार मुलांची आई आपल्या २० वर्षांच्या प्रियकरासोबत फरार झाली आहे.

AI Generated Image
सोशल मीडियावरील मैत्री आणि त्यातून निर्माण होणारे प्रेमसंबंध आज अनेकांचे संसार उद्ध्वस्त करत आहेत. उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर चार मुलांची आई आपल्या २० वर्षांच्या प्रियकरासोबत फरार झाली आहे. विशेष म्हणजे, जाताना ही महिला आपल्या दीड वर्षांच्या चिमुकलीलाही सोबत घेऊन गेली असून, हतबल पती आता न्यायासाठी पोलिसांचे उंबरठे झिजवत आहे.
इन्स्टाग्रामवर लागलं प्रेमाचं वेड
रायबरेलीच्या डीह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरैया मजरे टेकारी दांदू गावातील राजेश यांचा संसार सुखाने सुरू होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीची इन्स्टाग्रामवर एका २० वर्षीय तरुणाशी ओळख झाली. हळूहळू या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांमध्ये तासनतास बोलणे सुरू झाले. १६ डिसेंबर रोजी या प्रेमाचा असा काही उद्रेक झाला की, पत्नीने आपल्या चार मुलांचा आणि पतीचा विचार न करता थेट घर सोडण्याचा निर्णय घेतला.
मुलांना घेऊन पती हवालदिल
पत्नी बेपत्ता झाल्यापासून पती राजेश तिची सर्वत्र शोध घेत आहे. मात्र, काहीच पत्ता न लागल्याने त्यांनी पोलीस आणि प्रशासनाकडे धाव घेतली. "माझ्या पत्नीला त्या तरुणाने फूस लावून पळवून नेले आहे. आता माझ्या तीन लहान मुलांची काळजी कोण घेणार?" असा आर्त सवाल करत राजेश आपल्या मुलांसह पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचला आहे. मुलांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून उपस्थितांचेही मन हेलावले.
जिल्ह्यात सोशल मिडिया प्रेमाचे वाढते सत्र
रायबरेलीत अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. याआधीही एका तरुणीने इन्स्टाग्रामवरील प्रियकरासाठी दिल्लीहून रायबरेली गाठले होते. जेव्हा त्या तरुणाने लग्न करण्यास नकार दिला, तेव्हा तरुणीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा एकदा चार मुलांच्या आईने अशा प्रकारे घर सोडल्यामुळे सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावावर आणि त्यातून होणाऱ्या फसवणुकीवर चर्चा सुरू झाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, बेपत्ता महिला आणि त्या तरुणाचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जात आहे. प्रशासनाने पीडित पतीला लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.