कुख्यात रोशन शेखवर कारागृहात धारदार शस्त्राने हल्ला; इतर गुन्हेगारांनी वेळीच धाव घेतल्याने थोडक्यात वाचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 20:18 IST2021-04-25T20:17:53+5:302021-04-25T20:18:48+5:30
Infamous Roshan Sheikh attacked with a sharp weapon in Jail : रविवारी सकाळी ९.३० च्या सुमारास येथील मध्यवर्ती कारागृहात ही खळबळजनक घटना घडली.

कुख्यात रोशन शेखवर कारागृहात धारदार शस्त्राने हल्ला; इतर गुन्हेगारांनी वेळीच धाव घेतल्याने थोडक्यात वाचला
नागपूर - मोक्काच्या गुन्ह्यात साथीदारांसह कारागृहात असलेला कुख्यात गुंड रोशन कयूम शेख (वय ३१) याच्यावर कारागृहातीलच चार गुंडांनी जोरदार हल्ला चढवला. त्याची आधी बेदम धुलाई केली आणि नंतर धारदार शस्त्राने त्याला भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. कारागृह रक्षक आणि इतर गुन्हेगारांनी वेळीच धाव घेतल्याने रोशन बचावला. रविवारी सकाळी ९.३० च्या सुमारास येथील मध्यवर्ती कारागृहात ही खळबळजनक घटना घडली.
महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांना ब्लॅकमेल करणारा तसेच ठार मारण्याची धमकी देऊन लाखोंच्या मालमत्तेवर कब्जा मारणाऱ्या कुख्यात रोशनला वर्षभरापूर्वी पोलिसांनी धरमपेठेतील एका व्यावसाियकाचा गाळा हडपून त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. चाैकशीत तो श्रीमंत महिलांशी मैत्री करून त्यांची शारिरिक गरज पूर्ण करतो आणि नंतर तो व्हिडीओ दाखवून त्यांना ब्लॅकमेल करतो, असे उघड झाले होते. यातून त्याने कोट्यवधींची माया जमविली होती. पोलिसांनी त्याला आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का लावला होता. तपास संपल्यानंतर त्याला १० जून २०२० ला कारागृहात डांबण्यात आले. तेव्हापासून तो कारागृहातच आहे. येथेही तो गुंडगिरी करतो. त्यामुळे त्याचे अनेकांशी पटत नाही. आरोपी जतिन उर्फ जययोगेश जंगम (वय १८) , जेरान उर्फ बंटी जॉर्ज निकोलस (वय २२), विशाल नारायण मोहरले (वय १९) आणि अरनॉर्ल्ड उर्फ शेल्टीन क्रिस्टोफर (वय १९) यांच्यासोबत त्याची अनेक दिवसांपासून कुरबूर सुरू आहे. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ९.३० ला रोशन आंघोळ करून बरॅक क्रमांक तीन आणि चार जवळ आला. येथे उभा असलेल्या जतिन जंगम, जेरान उर्फ बंटीला त्याने घाणेरड्या शिव्या घातल्या. त्यामुळे या दोघांनी त्याच्यावर धाव घेतली. ते पाहून त्यांचे साथीदार विशाल मोहरले आणि अरनॉर्ल्डनेही रोशनला बदडणे सुरू केले. बेदम धुलाई करतानाच एकाने कारागृहातील भांड्याला घासून बनविलेल्या सुरीसारखे शस्त्र काढले. जीव धोक्यात असल्याचे पाहून रोशन बचाओ, बचाओ करू लागला. त्यामुळे कारागृह रक्षक तसेच काही बंदीवान मदतीला धावले. त्यांनी रोशनची आरोपीच्या तावडीतून सुटका केली. शस्त्र लागल्याने रोशनला जखमा झाल्या होत्या. म्हणून त्याला लगेच मेडिकलला रवाना करण्यात आले. माहिती कळताच कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी लगेच कारागृहात धाव घेतली. त्यांनी सर्व आरोपींना वेगवेगळ्या बराकीत हलविले आणि धंतोली पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी रोशनच्या बयानावरून सायंकाळी गुन्हा दाखल केला.
चारही आरोपी कुख्यात गुन्हेगार
आरोपी जतिन जंगम, जेरान उर्फ बंटी हे दोघे सदरमधील हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत. विशाल नारायण मोहरले (वय १९) हा हुडकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. हे तिघेही ८ सप्टेंबर २०२० पासून आत आहेत. तर त्यांचा साथीदार अरनॉर्ल्ड उर्फ शेल्टीन क्रिस्टोफर हा जरीपटक्यातील हत्या प्रकरणात आरोपी असून तो ३ ऑक्टोबर २०१९ पासून कारागृहात आहे.