अमेरिकेत गेलेल्या एका तरुण गुजराती महिलेवर काळाने भीषण घाला घातला आहे. लुईझियाना राज्यातील बॉसियर सिटीमध्ये एका स्टोअरमध्ये झालेल्या गोळीबारात ३० वर्षीय सोनिया गजरा गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्याच पतीच्या हातातून सुटलेली गोळी सोनिया यांच्या तोंडात शिरून जबड्यातून बाहेर पडली. या भीषण अपघातात सोनिया यांचा चेहरा पूर्णपणे बिघडला असून, त्या सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पती शरद गजरा याला अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना ४ एप्रिल रोजी बॉसियर सिटीमधील मेझो ग्रोसरी अँड डेली या दुकानात घडली. सोनिया आणि त्यांचे पती शरद हे त्या दुकानाच्या मालकाशी दुकान खरेदी करण्याबाबत चर्चा करत होते. चर्चा सुरू असतानाच अचानक शरद यांच्याकडील बंदुकीतून गोळी सुटली. अत्यंत जवळून झाडलेली ही गोळी सोनिया यांच्या तोंडात शिरली आणि जबडा फाडून आरपार गेली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सोनिया यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पतीला अटक, अपघाताच्या दाव्यावर संशय
या घटनेनंतर तब्बल १७ दिवसांनी शरद गजरा याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. पोलिसांनी त्याला शस्त्राचा बेकायदेशीर वापर केल्याच्या आरोपाखाली अटक केली. पोलिसांनी ही घटनाअपघात असल्याचे म्हटले असले, तरी प्रत्यक्षदर्शींनी मात्र यावर शंका उपस्थित केली. सार्वजनिक ठिकाणी लोड केलेली बंदूक सोबत ठेवणे आणि अशा प्रकारे गोळी सुटणे, यामागे नेमका काय उद्देश होता, याचा तपास आता अमेरिकन पोलीस करत आहेत.
सोनियाची प्रकृती चिंताजनक; शस्त्रक्रियांची गरज
सोनिया यांच्या चेहऱ्याला आणि जबड्याला गंभीर इजा झाली आहे. गोळीच्या आघातामुळे त्यांचे दात, ओठ आणि जबड्याचे हाड पूर्णपणे निकामी झाले आहे. त्या सध्या स्वतःहून श्वास घेऊ शकत नाहीत की काही खाऊ शकत नाहीत. डॉक्टरांच्या मते, त्यांचा चेहरा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी अनेक फेशियल रिकन्स्ट्रक्शन आणि जबड्याच्या पुनर्रचनेची शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत. तरीही त्या पहिल्यासारख्या दिसतील का, याबाबत शंका आहे.
मदतीसाठी सरसावले हात; १.९ कोटी गोळी लक्ष्य
सोनिया या काही काळापूर्वीच अमेरिकेत स्थायिक झाल्या होत्या. त्यांना कॉस्मेटोलॉजिस्ट बनायचे होते. भारतातील कुटुंबासाठी आधार असणाऱ्या सोनिया यांच्यावर मोठा प्रसंग उभा राहिला आहे. गुजरातमध्ये राहणाऱ्या त्यांच्या वृद्ध वडिलांची आणि कुटुंबाची जबाबदारी सोनियांच्या खांद्यावर होती. त्यांच्या उपचारासाठी तब्बल २ लाख डॉलर्स (सुमारे १ कोटी ९० लाख रुपये) खर्च अपेक्षित आहे. यासाठी सोशल मीडियावर क्राउडफंडिंग मोहिमेद्वारे मदत मागितली जात आहे. २४ एप्रिलपर्यंत सुमारे ८.६ लाख रुपये जमा झाले आहेत.
Web Summary : In Louisiana, a Gujarati woman was shot in the face, allegedly by her husband. He's arrested after 17 days. She's critically injured, needing extensive facial reconstruction. A crowdfunding campaign seeks $200,000 for her treatment.
Web Summary : लुइसियाना में एक गुजराती महिला को कथित तौर पर उसके पति ने गोली मार दी। 17 दिन बाद वह गिरफ्तार। महिला गंभीर रूप से घायल, चेहरे की सर्जरी की जरूरत। इलाज के लिए क्राउडफंडिंग से $200,000 जुटाए जा रहे हैं।