रेल्वेस्थानकासमोर ‘वास्तव’चा सिन; आमलेट जळाल्याचा वाद, आरोपीने गरम तवा डोक्यावर मारला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 22:58 IST2021-12-12T22:57:55+5:302021-12-12T22:58:04+5:30
अमरावती जिल्ह्यातील व्यक्ती जबर जखमी

रेल्वेस्थानकासमोर ‘वास्तव’चा सिन; आमलेट जळाल्याचा वाद, आरोपीने गरम तवा डोक्यावर मारला
नागपूर - पावभाजी खायला आलेले गुंड ‘डेडफुट्या’ला शिवीगाळ करून मारहाण करतात. त्यामुळे संतप्त झालेला संजय दत्त एका गुंडांच्या डोक्यावर चक्क पावभाजीच्या तव्यानेच हल्ला चढवतो. वास्तव चित्रपटातील या दृष्याची आठवण करून देणारा प्रकार शनिवारी सायंकाळी रेल्वेस्थानकावर घडला.
अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजारजवळच्या पिंपळखुटा (पुरडपूर्णा) येथील संदीप दिगांबर सायरे (वय ३४) शनिवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास मध्यवर्ती रेल्वेस्थानकासमोर आले. त्यांना आमलेट खायची ईच्छा झाल्याने ते स्थानकासमोरच्या गेटजवळ आरोपी विनोद ददनसिंग राठोड (वय ४८) याच्या सेंटरवर गेले. आरोपी राठोडने सायरेंना जळलेले आमलेट दिले. हे आपण खाणार नाही, दुसरे चांगले आमलेट बणवून दे, असे सायरे म्हणाला. तर तू आमलेट उष्टे केले. त्यामुळे त्याचे पैसे तुला द्यावेच लागेल, असे राठोड म्हणू लागला.
यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि आरोपी राठोडने रागाच्या भरात आमलेट बनविण्याचा गरम तवा सायरेच्या डोक्यावर हाणला. त्याला अश्लिल शिवीगाळ करून धमकीही दिली. सायरे गंभीर जखमी झाल्याने आजुबाजूची मंडळी मदतीसाठी धावली. त्यांनी आरोपी राठोडला आवरले. सायरेने डॉक्टरकडे उपचार करून घेतल्यानंतर सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी राठोडविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.