प्रेमाने त्याला उठवायला गेली अन् मार खाऊन आली; पुण्यात लिव्ह-इन पार्टनरवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 22:54 IST2022-12-21T22:54:03+5:302022-12-21T22:54:13+5:30
पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमाने त्याला उठवायला गेली अन् मार खाऊन आली; पुण्यात लिव्ह-इन पार्टनरवर गुन्हा दाखल
- किरण शिंदे
लिव्ह-इन- रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये वादाच्या अनेक घटना आपण यापूर्वी ऐकले असतील. दिल्लीतील आफताब आणि श्रद्धा या प्रकरणानंतर तर या नातेसंबंधावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुण्यातही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यात हाणामारीचा प्रकार घडला. गाढ झोप येत असणाऱ्या आपल्या पार्टनरला उठवण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला मारहाण करण्यात आली. या प्रकारानंतर तिने थेट पोलीस स्टेशन गाठत आपल्या जोडीदाराविरुद्ध तक्रार दिली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की 34 वर्षाची तरुणी आणि 38 वर्षाचा तरुण. दोघेही उच्चशिक्षित. कोरेगाव पार्क परिसरातील एका आलिशान जागेत राहणारे. दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर. नामांकित कंपनीत कामालाही आहे. एकत्र काम करत असतानाच या दोघांची ओळख झाली. त्यानंतर मागील वर्षभरापासून ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत.
दरम्यान 19 डिसेंबरच्या सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास फिर्यादी तरुणी गाढ झोपेत असलेल्या आपल्या पार्टनरला उठवण्यासाठी गेली होती. मात्र तरुण काही उठत नव्हता. पुन्हा पुन्हा ती त्याला जबरदस्तीने झोपेतून उठवत असल्यामुळे तरुणाला राग आला आणि त्याने चिडून हाताने मारहाण केली. मारहाण झाल्याने चिडलेल्या तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि जोडीदारा विरोधात तक्रार दिली. कोरेगाव पार्क पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.