CBI ऑफिसर बनून लॉजवर झाडाझडती; सर्वांनाच धडकी, एक कॉल अन् भलतंच आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 13:22 IST2023-01-04T13:22:27+5:302023-01-04T13:22:48+5:30
घाटकोपरच्या एका लॉजमध्ये सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून झाडाझडती सुरू झाली.

CBI ऑफिसर बनून लॉजवर झाडाझडती; सर्वांनाच धडकी, एक कॉल अन् भलतंच आलं समोर
मुंबई: घाटकोपरच्या एका लॉजमध्ये सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून झाडाझडती सुरू झाली. रजिस्टर बघून थेट रूममधील जोडप्यांना दमदाटी करून ओळखपत्राची तपासणी करण्यात आली. खरेच सीबीआय अधिकारी आल्याचे पाहून सर्वांनाच धडकी भरली. मात्र, एका ग्राहकाला संशय आला आणि त्याने थेट पोलिसांना कॉल करून माहिती दिल्यानंतर तो अधिकारी नसल्याचे उघड झाले. घाटकोपर पोलिसांनी दीपक चंद्रसेन मोरे (२४) या आरोपीला अटक केली आहे.
घाटकोपर रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या निओ लॉजमध्ये हा प्रकार घडला. येथील वेटर रिंकू उदय मैती (३०) याच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. १ तारखेच्या मध्यरात्री मोरे सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून लॉजमध्ये आला, जोडप्यांची नोंद न ठेवता राहण्यास देत असल्याची तक्रार आल्याचे सांगून झाडाझडती घेण्यास सुरुवात झाली. टीमला बोलावून घेतो म्हणत थेट लॉजमधील रूममध्ये प्रवेश करत जोडप्यांचे ओळखपत्र तपासले.
रजिस्टर, ओळखपत्रांचे फोटो काढले. या प्रकाराने सगळेच घाबरले. काही वेळ कर्मचाऱ्यांसह ग्राहकांचा गोंधळ उडाला. लॉजमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. तपासणी सुरू असतानाच एका ग्राहकाला संशय आल्याने त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. तेव्हा, अधिकारी नसून बेरोजगार असल्याचे समजले.
बेरोजगारीमुळे उचलले पाऊल
दारुच्या नशेत त्याने हा प्रताप केला. मानखुर्द परिसरात राहणारा मोरे बारावी पास असून मेडिकलमध्ये नोकरी करत होता. महिनाभरापूर्वी नोकरी सुटली. त्यामुळे बेरोजगारीमुळे काहीच आधार नसल्याने गुन्हे मालिका पाहून त्याने झटपट पैसे कमविण्यासाठी असे पाऊल उचलल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार, घाटकोपर पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.