'IC-814' हायजॅक आणि मसूद अजहरची सुटका; त्या ७० तासांत नेमकं काय घडलं? कुख्यात दहशतवाद्याचा नवा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 11:24 IST2026-01-02T11:18:34+5:302026-01-02T11:24:04+5:30
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा एक खळबळजनक ऑडिओ समोर आला आहे.

'IC-814' हायजॅक आणि मसूद अजहरची सुटका; त्या ७० तासांत नेमकं काय घडलं? कुख्यात दहशतवाद्याचा नवा दावा
भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक काळा दिवस मानल्या जाणाऱ्या 'IC-814' विमान अपहरणाच्या घटनेला अनेक वर्षे उलटली असली, तरी या जखमा अजूनही ताज्या आहेत. आता याच प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा एक खळबळजनक ऑडिओ समोर आला आहे. या ऑडिओमध्ये त्याने भारतीय तुरुंगातून आपली सुटका कशी झाली आणि कशाप्रकारे कोणत्याही तपासणीशिवाय त्याला विमानात बसवून पाठवण्यात आले, याचा पाढा वाचला आहे.
"दिल्लीहून अधिकारी मला पकडण्यासाठी आले होते"
मसूद अजहरने या ऑडिओमध्ये दावा केला आहे की, "माझ्या सुटकेपूर्वी दिल्लीहून काही मोठे अधिकारी मला भेटायला आले होते. माझा जिहादचा जज्बा संपला आहे की अजून जिवंत आहे, हे त्यांना पाहायचे होते. त्यांनी मला विचारले की, तुझी सुटका झाली तर काश्मीरमधील जिहाद संपेल का? मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, ५० वर्षे झाली तरी हे युद्ध संपणार नाही."
जसंवत सिंह यांचा उल्लेख आणि सुटकेचा क्षण
या दहशतवाद्याने तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांचाही उल्लेख केला आहे. तो म्हणतो, "विमान अपहरण झाल्यानंतर जसवंत सिंह सलग ७० तास जागे होते. अधिकारी मला म्हणायचे की, तुझी कबर याच मातीत खोदली जाईल. पण अल्लाची मर्जी काही वेगळीच होती. त्याच अधिकाऱ्यांनी नंतर येऊन मला सांगितले की, मौलाना तुम्हाला जावे लागेल."
"ना तपासणी, ना बोर्डिंग... फक्त दहशत होती"
आपल्या सुटकेच्या वेळच्या परिस्थितीचे वर्णन करताना मसूद म्हणाला, "मला विमानात नेण्यापूर्वी कोणतीही बोर्डिंग प्रक्रिया झाली नाही. माझ्याकडे व्हिसा नव्हता, पासपोर्ट नव्हता की इमिग्रेशनची कोणतीही तपासणी झाली नाही. माझी झडती घेण्याचीही त्यांची हिंमत नव्हती. ते इतके घाबरले होते की, त्यांनी फक्त माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि हातात बेड्या ठोकून मला विमानापर्यंत नेले."
काय होते हे प्रकरण?
३१ डिसेंबर १९९९ रोजी इंडियन एअरलाईन्सचे 'IC-814' हे विमान काठमांडूहून दिल्लीला येत असताना दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले होते. हे विमान अफगाणिस्तानच्या कंदहारला नेण्यात आले होते. विमानात असलेल्या १८० प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी भारत सरकारला मसूद अजहरसह अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद जरगर या तीन खतरनाक दहशतवाद्यांना सोडावे लागले होते.
सुटकेनंतर मसूद अजहरने पाकिस्तानात जाऊन 'जैश-ए-मोहम्मद' या संघटनेची स्थापना केली आणि भारतावर संसदेवरील हल्ला आणि पुलवामा हल्ला यांसारखे मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणले.