ग्रेटर नोएडामधील निक्की हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला आहे. निक्कीला तिचा नवरा विपिन भाटी आणि सासूने जिवंत जाळल्याच्या या क्रूर घटनेने लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सोशल मीडियावर निक्कीसाठी न्याय मागितला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी निक्कीचा नवरा, सासू-सासरे आणि दीर यांना अटक केली आहे. आता निक्कीच्या आईने एक भावूक निवेदन दिले असून, त्यात त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे आणि आपली मोठी मुलगी कंचनला पुन्हा त्या घरात पाठवणार नाही असे ठामपणे सांगितले आहे.
"त्या घरात एका मुलीला पाठल्याचा आम्हाला पश्चात्ताप होतोय. आता दुसऱ्या मुलीला त्या घरात पाठवण्याची चूक करणार नाही", असं म्हणताना निक्कीच्या आईच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.
कुटुंब न्यायासाठी लढणार!
निक्कीच्या मृत्यूनंतर तिची आई कोलमडून गेली आहे. आपल्या मुलीसोबत झालेल्या या क्रूरतेमुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्य संतप्त आहे. निक्कीच्या वडिलांनी या हत्येची सूत्रधार निक्कीची सासू असल्याचा आरोप केला होता. आता तिच्या आईनेही मन हेलावून टाकणारे विधान केले आहे. "आम्ही आमच्या मोठ्या मुलीला कंचनला आता पुन्हा त्या घरात पाठवणार नाही," असे त्या म्हणाल्या आहेत. "एका मुलीला पाठवून आम्ही आधीच पश्चात्ताप करत आहोत," असे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते.
पती आणि सासूलाही जाळा!
निक्कीच्या आईने आरोपींसाठी कठोर शिक्षेची मागणी केली आहे. "ज्याप्रमाणे विपिन आणि त्याच्या आईने माझ्या मुलीला जिवंत जाळले, त्याचप्रमाणे या दोघांनाही जाळून मारले पाहिजे," अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. "निक्कीचा दीर रोहित आणि सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे," असेही त्या पुढे म्हणाल्या. तर, निक्कीच्या वडिलांनी या चारही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, तरच निक्कीला न्याय मिळेल, अशी मागणी केली आहे.
बहिणी करायच्या कमाई अन् नवरे मात्र...
पोलिसांच्या चौकशीत निक्की आणि तिची बहीण कंचन पार्लर चालवून उदरनिर्वाह करत असल्याचे समोर आले आहे. दोन्ही बहिणी सोशल मीडियावरही खूप सक्रिय होत्या. त्यांनी त्यांच्या पार्लरच्या नावाने इन्स्टाग्राम अकाउंटही तयार केले होते. कंचनचे अकाउंट सार्वजनिक आहे आणि तिचे चांगले फॉलोअर्स आहेत, तर निक्कीचे अकाउंट खासगी होते. निक्की आणि कंचन दोघीही रील्स बनवून इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असत. मात्र, विपिनला त्यांचे रील्स बनवणे आवडत नव्हते. जेव्हाही त्या रील्स बनवायच्या, तेव्हा विपिन आणि त्याच्या घरातील मंडळी निक्की आणि कंचनशी भांडण करत असत. या प्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.