मी पोलीस आहे, कायदा मलाही कळतो, महिलेने पोलीस ठाण्यातच घातला गोंधळ, अखेर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 19:27 IST2022-05-11T19:26:35+5:302022-05-11T19:27:06+5:30
Bogus Police Arrested : तोतया पोलीस बनलेल्या २७ वर्षीय महिलेचं नाव कविता प्रकाश दोडके असं आहे.

मी पोलीस आहे, कायदा मलाही कळतो, महिलेने पोलीस ठाण्यातच घातला गोंधळ, अखेर...
स्वतःच्या फायद्यासाठी किंवा आपला दबदबा निर्माण करण्यासाठी अनेकजण पोलीस अथवा मोठा अधिकारी असल्याचा बनाव करून फसवणूक करत असल्याची अनेक प्रकरणं यापूर्वी उघडकीस आली आहेत. मात्र, पुण्यातील भोसरीमध्ये चक्क एका महिलेने पोलीस असल्याचं बनाव रचत चक्क पोलीस ठाण्यातच गोंधळ घातला. या प्रकारामुळे भोसरी एमआयडीसी पोलीस स्थानकातील पोलीस देखील तिच्या बनवला बळी पडले. पण एका पोलीस अधिकाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे या महिलेचं बिंग फुटलं आणि तिचा खरा चेहरा समोर आला. हे सगळं करण्यामागचं महिलेनं सांगितलेले कारण ऐकून भोसरी एमआयडीसीमधील पोलीस देखील थक्क झाले. तोतया पोलीस बनलेल्या २७ वर्षीय महिलेचं नाव कविता प्रकाश दोडके असं आहे.
कविता दोडके ही सोमवारी संतोष पोटभरे नावाच्या एका २४ वर्षीय तरुणासोबत भोसरी एमआयडीसी पोलीस स्थानकात गेली. तिथे बाळू पोटभरे नावाच्या व्यक्तीची चौकशी कशाला करत आहात? मलाही कायदा कळतो” असं म्हणत कविताने गोंधळ घालायला सुरुवात केली. कविताने पोलीस असल्याचा इतका हुबेहूब पोलिसासारखा अभिनय केला की, काही वेळ तेथील पोलीसही तिच्या या नाटकामुळे गोंधळून गेले. मात्र, एका पोलीस अधिकाऱ्याने प्रसंगावधान दाखवत कविताला तिचा बक्कल नंबर विचारला. इथे मात्र कविता गोंधळली आणि अखेर तिचं बिंग उघड झालं.