हैदराबादमध्ये घरमालकिणीची भाडेकरूने केली निर्घृण हत्या; ७०० किमी दूर नदीत फेकला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:53 IST2025-12-31T12:49:41+5:302025-12-31T12:53:22+5:30
हैदराबादमध्ये भाडेकरूनेच घरमालकिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हैदराबादमध्ये घरमालकिणीची भाडेकरूने केली निर्घृण हत्या; ७०० किमी दूर नदीत फेकला मृतदेह
Hyderabad Crime: एकट्या राहणाऱ्या वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हैदराबादमधील नाचराम परिसरात एका ३३ वर्षीय कॅब ड्रायव्हरने आपल्या ६५ वर्षीय घरमालकिणीची केवळ सोन्याच्या दागिन्यांसाठी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुजाता (६५) असे मृत महिलेचे नाव असून, आरोपीने हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह चक्क शेजारच्या राज्यातील गोदावरी नदीत फेकून दिला होता.
मल्लापूर येथील बाबा नगरमध्ये राहणाऱ्या सुजाता यांचे पती आणि मुलांचे आधीच निधन झाले होते. त्या घरात एकट्याच राहायच्या. साधारण दोन महिन्यांपूर्वी आंध्र प्रदेशातील कोनासीमा जिल्ह्यातील अंजीबाबू (३३) या कॅब ड्रायव्हरने त्यांच्या घराचा एक भाग भाड्याने घेतला होता. सुजाता एकट्या आहेत आणि त्यांच्याकडे भरपूर सोने आहे, हे पाहून अंजीबाबूच्या मनात त्यांना लुटण्याचा विचार आला.
असा रचला हत्येचा कट
१९ डिसेंबरच्या रात्री अंजीबाबूने सुजाता यांच्या घरात घुसून त्यांची गळा आवळून हत्या केली. त्यांच्या अंगावरील सुमारे ११ तोळे सोन्याचे दागिने लुटल्यानंतर त्याने घराला बाहेरून कुलूप लावले आणि आपल्या मूळ गावी पळ काढला. त्याने त्याचा मित्र युवराजू (१८) आणि दु्र्गाराव (३५) यांना या गुन्ह्याची माहिती दिली.
७०० किमीचा प्रवास आणि मृतदेहाची विल्हेवाट
२० डिसेंबर रोजी हे तिन्ही आरोपी कार भाड्याने घेऊन पुन्हा हैदराबादला आले. त्यांनी सुजाता यांचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि कारमधून आंध्र प्रदेशातील कोनासीमा जिल्ह्यात नेला. तिथल्या वैनतेय गोदावरी नदीच्या पात्रात त्यांनी मृतदेह फेकून दिला. आरोपींना वाटले की मृतदेह वाहून जाईल आणि आपण कधीच पकडले जाणार नाही.
सुजाता यांची बहीण सुवर्णलता यांनी जेव्हा घरी भेट दिली, तेव्हा घराला कुलूप होते आणि सुजाता यांचा फोन लागत नव्हता. त्यांनी २४ डिसेंबर रोजी नाचराम पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास केला असता, भाडेकरू अंजीबाबू बेपत्ता असल्याचे समोर आले. संशयावरून पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अंजीबाबूला ताब्यात घेतले.
सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अंजीबाबूने पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ आंध्र प्रदेश गाठले. आरोपीने दाखवलेल्या जागेवरून नदीच्या पात्रातून मंगळवारी सकाळी सुजाता यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी मुख्य आरोपी अंजीबाबू आणि त्याच्या दोन साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून लुटलेले सोनेही ताब्यात घेण्यात आले आहे.