मुलगा मेल्याचे नाटक अन् मुलीच्या गळफासाचा बनाव; पत्नीला परत बोलवण्यासाठी पतीचा धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 22:47 IST2021-08-10T22:40:01+5:302021-08-10T22:47:54+5:30
The husband plotted the death of his son and daughter : मुलीला फॅनला लटकवले, मुलाचा मृत्यू झाल्याचा केला बनाव; हत्येच्या प्रयत्न केल्याप्रकरणी पतीला अटक

मुलगा मेल्याचे नाटक अन् मुलीच्या गळफासाचा बनाव; पत्नीला परत बोलवण्यासाठी पतीचा धक्कादायक प्रकार
मुंबई - पत्नी सोडून उत्तर प्रदेशात माहेरी गेलेल्या म्हणून तिला परत आणण्यासाठी मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या पतीला कुरार पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पती मद्यपी आणि अमली पदार्थांचा व्यसनाधीन असल्याची माहिती मिळत आहे. अजय गौड(30) असे अटक आरोपीचे नाव असून तो मालाड(पू.) येथील कुरार परिसरातील रहिवासी आहे.
गौड व्यवसायाने रंगकाम करणारा असून दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करत असल्यामुळे त्याची पत्नी दोन वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली होती. १३ वर्षाची मुलगी, ८ वर्षाचा मुलगा, ३ वर्षाची मुलगी व ९ महिन्याची मुलगी अशी आरोपीचा चार मुले आहेत. आरोपीची पत्नी चारही मुलांना घेऊन उत्तर प्रदेशात गेली होती. पण शाळा सुरू होईल या आशेने तिने दोन मोठ्या मुलांना मुंबईला पाठवले. नंतर देखील तो मुलांनाही मारहाण करत असे. तसेच पत्नी परत येण्यास तयार नसल्यामुळे तो रागात होता. पत्नीला परत आणण्यासाठी त्याने बनाव रचण्याचे ठरवले आणि मुलांच्या जीवाशी खेळला.
शनिवारी रात्री त्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा बनाव करण्यासाठी मुलाला जमीनीवर झोपण्यास सांगितले व त्याच्या अंगावर पांढरा कपडा घातला. त्यानंतर त्याचे छायाचित्र काढले. तेवढ्यावरच तो थांबला नाही. त्याने गळफाश बनवला व पंख्याला बांधून तो मुलीच्या गळ्यात घातला. त्यानंतर तिला बादलीवर उभी राहण्यास सांगितले. त्याने मुलीला बादलीवरून उडी मारण्यास सांगितले. अन्यथा तो बादली पाडेल, अशी धमकी दिली. त्यावेळी घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा करण्यास सुरूवात केला. तिचा आवाज ऐकून शेजारच्यांनी गौडच्या घरी धाव घेतली. त्यावेळी हा प्रकार उघड झाला. शेजारी राहणाऱ्या व्यक्तींनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्याविरोधात कुरार पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.