हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 01:09 IST2025-09-09T01:09:35+5:302025-09-09T01:09:51+5:30
लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल...

हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
लातूर : हुंड्याच्या कारणावरून विवाहितेचा मृत्यू झाल्याच्या खटल्यात दाेषी ठरलेला पती आणि सासूला लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. भाेसले यांनी १५ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
सरकारी वकील मीरा कुलकर्णी यांनी साेमवारी सांगितले, कल्पना हिचा विवाह २०१३ मध्ये सूर्यकांत जायभाये यांच्यासाेबत १८ मे २०१३ मध्ये झाला होता. दरम्यान, विवाहाच्यावेळी पाच लाख हुंडा म्हणून देण्याचे ठरले हाेते. मात्र, प्रत्यक्षात तीन लाख रुपये आणि साेन्याचे दागिने देण्यात आले. हुंड्यातील उर्वरित दोन लाखांसाठी कल्पनावर सतत दबाव आणला जात होता. प्रारंभी दोन वर्ष संसार सुरळीत चालला. नंतर पती सूर्यकांत आणि सासू राधाबाई यांनी हुंड्यातील उर्वरित पैशांसाठी कल्पनाचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. २४ फेब्रुवारी २०१७ रोजी कल्पनाला घरातून हाकलून दिले. ५ मार्च २०१७ रोजी तिचा मृतदेह सांडाेळ (ता. चाकूर) शिवारातील एका विहिरीत आढळून आला. याबाबत वडिलांनी चाकूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पती, सासू आणि कुटुंबातील इतर मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करून, पाेउपनि. संतोष गीते यांनी तपास केला.
साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे आणि पंचनामा महत्त्वपूर्ण ठरला. या पुराव्याच्या आधारे हा मृत्यू नैसर्गिक नसून हुंड्याच्या छळामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. अखेर सुनावणीअंती न्यायाधीश आर. आर. भाेसले यांनी पती सूर्यकांत जायभाये व सासू राधाबाई जायभाये यांना हुंडाबळीप्रकरणी दाेषी ठरवत १५ वर्षांचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी २० हजारांचा दंड, तसेच कलम ४९८ (अ) अन्वये तीन वर्षांची शिक्षा व १५ हजारांचा दंड अशी शिक्षा ठाेठावली.
सरकार पक्षाच्या वतीने ॲड. मीरा कुलकर्णी-देवणीकर यांनी युक्तिवाद केला. त्यांना सहायक वकील दिग्विजय माकणे, ॲड. ईश्वर वर्मा, ॲड. अभिनय मुंडे, ॲड. प्रसाद शेटे, ॲड. प्रथमेश डोंगरे यांनी सहकार्य केले. पैरवी अधिकारी म्हणून चाकूर ठाण्याचे चंद्रकांत राजमाले यांनी केले.