हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 16:52 IST2025-05-11T16:51:03+5:302025-05-11T16:52:03+5:30
एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जितेंद्र हा कालिंजर पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहेत.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका घरात पती, पत्नी आणि दोन महिन्यांच्या मुलाचा मृतदेह आढळला. अटारा कोतवाली भागात ही घटना घडली. बंद खोलीतून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी पोलिसांकडे केली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा तोडल्यानंतर घरातील दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला. खोलीत पती, पत्नी आणि मुलाचा मृतदेह पडला होता.
जितेंद्र हा कालिंजर पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहेत. प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की, पतीने सर्वात आधी पत्नी आणि मुलाची गळा दाबून हत्या केली आणि नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिस अधीक्षक पलाश बन्सल यांनी घटनास्थळी पोहोचून अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा केले. त्याने सांगितलं की जितेंद्रचे लग्न एप्रिल २०२४ मध्ये झालं. लग्न झाल्यापासूनच पती-पत्नीमध्ये हुंड्यावरून वाद होत होता, या कारणास्तव तो अटारा शहरात भाड्याने राहू लागला. घटनास्थळी सापडलेल्या मोबाईल फोनमधील मेसेजमध्ये जितेंद्रने आपली मानसिक स्थिती आणि कौटुंबिक तणावांबद्दल सांगत आपली व्यथा मांडली.
पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमागील संपूर्ण सत्य समोर येण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.