बायकोची हत्या केल्याच्या आरोपाखाली पती चार महिने तुरुंगात अन् पत्नी दिल्लीत प्रियकरासोबत आनंदात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 15:08 IST2025-11-26T15:06:31+5:302025-11-26T15:08:09+5:30
ज्या पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पती गेल्या चार महिन्यांपासून तुरुंगात होता, ती पत्नी जिवंत आणि प्रियकरासोबत सुखी असल्याचे उघड झाले.

AI Generated Image
बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यात एक अशी घटना उघडकीस आली आहे, ज्यामुळे पोलीस प्रशासन आणि सामान्य नागरिकही अचंबित झाले आहेत. पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली गेल्या चार महिन्यांपासून एक पती तुरुंगात होता, मात्र आता पोलिसांनी तपास केला असता त्याची मृत पत्नी चक्क दिल्लीमध्ये तिच्या प्रियकरासोबत सुखाने राहत असल्याचे समोर आले आहे.
मोतिहारीच्या अरेराज पोलीस स्टेशन क्षेत्रातील वॉर्ड-१० मधील महाबली चौक येथील रहिवासी रंजीत कुमार यांच्यासोबत हे नाट्यमय प्रकरण घडले आहे. रंजीत कुमार यांचे लग्न हरसिद्धी पोलीस स्टेशन क्षेत्रातील कृतपूर मठिया येथील गुंजा देवी यांच्यासोबत झाले होते. लग्नानंतर गुंजा देवी सतत कोणा अज्ञात व्यक्तीशी फोनवर बोलत असल्याचा आरोप रंजीतने केला होता. पण ३ जुलै २०२५ रोजी जे घडले, त्याने रंजीतचे आयुष्य पूर्णपणे बदलले.
नेमके काय घडले?
३ जुलै २०२५ च्या रात्री गुंजा देवीचे पती रंजीत कुमार यांच्यासोबत जोरदार भांडण झाले आणि त्यानंतर ती मध्यरात्री घरातून निघून गेली. पत्नी गायब झाल्यानंतर रंजीत कुमारने दुसऱ्याच दिवशी अरेराज पोलीस स्टेशनमध्ये पत्नीच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली.
मात्र, यानंतर दोन दिवसांतच घटनेला अत्यंत गंभीर वळण मिळाले. गुंजा देवीच्या वडिलांनी पोलिसांकडे अर्ज दिला की, रंजीतने त्यांच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह नष्ट केला आहे. या तक्रारीमुळे पोलीस रंजीतला अटक करण्यासाठी त्याच्या मागावर लागले. पत्नीच्या वडिलांनी हत्येचा आरोप केल्यानंतर घाबरलेल्या रंजीतने घटना घडल्यानंतर अवघ्या एका आठवड्यातच न्यायालयात आत्मसमर्पण केले. तेव्हापासून तो पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात बंद होता.
पोलिसांनी लावला गुंजाचा छडा
रंजीतचे कुटुंबीय आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे, तसेच आधुनिक पाळत तंत्रज्ञानाच्या आधारावर पोलिसांनी या प्रकरणाचा पुन्हा तपास सुरू केला. अखेर सोमवारी पोलिसांना यश आले. गुंजा देवी तिच्याच गावच्या एका मुलासोबत दिल्लीमध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तातडीने दिल्लीत जाऊन गुंजा आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे.
आता होणार न्यायालयीन कारवाई
अरेराज पोलीस स्टेशनच्या प्रभारी प्रत्याशा कुमारी यांनी माहिती दिली की, गुंजा देवी आणि तिच्या प्रियकराला दिल्लीतून बिहारमध्ये परत आणले जात आहे. गुंजा मोतिहारीत पोहोचल्यानंतर न्यायालयात तिचा जबाब नोंदवला जाईल.
ज्या पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पती गेल्या चार महिन्यांपासून तुरुंगात होता, ती पत्नी जिवंत आणि प्रियकरासोबत सुखी असल्याचे उघड झाल्यामुळे, आता न्यायालय या प्रकरणात काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चार महिने विनाकारण तुरुंगात राहिलेल्या रंजीतला आता न्याय मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.