व्हिडिओ कॉलवर बोलताना पतीने अचानक केली आत्महत्या, पत्नीने घेतले जाळून
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 21:30 IST2022-03-28T21:29:54+5:302022-03-28T21:30:14+5:30
Suicide Case : धवल सिंग यांचा धाकटा मुलगा महेश सिंग (४०) हा रविवारी दुपारी पत्नीशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलत होता. व्हिडिओ कॉल सुरू असताना अचानक महेश सिंगने सर्व्हिस रिव्हॉल्व्हर काढून स्वत:वर गोळी झाडून घेतली.

व्हिडिओ कॉलवर बोलताना पतीने अचानक केली आत्महत्या, पत्नीने घेतले जाळून
भोजपूर - बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातून एक वेदनादायक घटना समोर आली आहे. येथे व्हिडिओ कॉल दरम्यान पतीने पत्नीसमोरच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पतीने आत्महत्या केल्यानंतर पत्नीनेही स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत ती गंभीररित्या भाजली आहे. त्यांना पाटणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना उदावंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिनिया गावातील आहे. धवल सिंग यांचा धाकटा मुलगा महेश सिंग (४०) हा रविवारी दुपारी पत्नीशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलत होता. व्हिडिओ कॉल सुरू असताना अचानक महेश सिंगने सर्व्हिस रिव्हॉल्व्हर काढून स्वत:वर गोळी झाडून घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश सिंग हे तेलंगणातील सिकंदराबाद येथे 16 बिहार रेजिमेंटमध्ये नायक म्हणून तैनात होते. महेश बऱ्याच दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता, असे सांगण्यात येत आहे. रविवारी दुपारी ते पत्नी गुडियासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होते. गुडिया अनेकदा त्यांना फोनवर समजावून सांगायची आणि रविवारीही ती पतीला समजावून सांगत होती. मात्र महेशने सिकंदराबादमध्ये स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पतीच्या आत्महत्येमुळे हताश झालेल्या गुडियाने स्वत:वर रॉकेल ओतून पेटवून घेतले. घरातील लोकांना काही समजेपर्यंत ती 85 टक्क्यांहून अधिक भाजली होती. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ आरा सदर रुग्णालयात नेले, जिथे त्याची गंभीर प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी पाटणा येथे रेफर केले. सध्या गुडियावर पाटणा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच महेशचा मोठा भाऊ जयनाथ सिंह यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहा भावांमध्ये सर्वात लहान असलेला महेश सिंग आपल्या आईसोबत गावात वेगळ्या घरात राहत होता. 2003 मध्ये दानापूरमध्ये सैन्यात भरती झाल्यानंतर ते गलवान व्हॅलीमध्ये आणि सुमारे सहा महिन्यांपूर्वी हैदराबादमधील सिकंदराबाद येथे आले होते. या घटनेनंतर महेशची मुलगी आणि दोन मुलांची प्रकृती बिघडली आहे.