चिपळूण - चिपळूण तालुक्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. देवखेरकी गावातील एका हापूस आंब्याच्या बागेत मानवी हाडांचा जळालेला सापळा शनिवारी दुपारी सापडल्याने संपूर्ण कोकण हादरले आहे. एका निळ्या रंगाच्या बॅगेत हा मृतदेह भरून तो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीला शोधणे हे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
रामपूर हद्दीतील देवखेरकी परिसरात एका क्रूर हत्याकांडाचे भीषण वास्तव समोर आले आहे. एका हापूस आंब्याच्या बागेजवळ जंगलात मानवी हाडांचा जळालेला सापळा आढळून आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हे अवशेष १२ ते १३ वर्षे वयोगटातील एका मुलाचे किंवा मुलीचे असण्याची शक्यता आहे. निळ्या रंगाच्या बॅगेत मृतदेह कोंबून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तो पेटवून देण्यात आल्याचे दिसून येत आहे.
या घटनेमागील खरी गुंतागुंत दीड महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती. बागेत काम करणाऱ्या एका मजुराला त्यावेळी हा मृतदेह दिसला होता. मृतदेहाचे डोके बॅगेच्या बाहेर होते आणि अवस्था अत्यंत भीषण होती. मात्र, प्रचंड भीतीपोटी या मजुराने दीड महिना कोणालाही काहीही सांगितले नाही. अखेर मनावरचा ताण असह्य झाल्याने त्याने बागेच्या मालकाला ही हकिगत सांगितली आणि या भीषण प्रकरणाचा उलगडा झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दीड महिना उलटल्याने मृतदेह पूर्णपणे जळून त्याचा केवळ सांगाडा उरला आहे. घटनास्थळी जळालेल्या निळ्या बॅगेचे अवशेष आणि दोन लोखंडी रॉड सापडले आहेत, जे या कृत्यात वापरले गेल्याचा संशय आहे.
रत्नागिरी येथून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून हाडांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. ज्या क्रूरतेने हा मृतदेह बॅगेत भरून जाळला गेला आहे, त्यावरून हा पूर्वनियोजित खून असल्याचा संशय बळावला आहे. इतक्या लहान वयाच्या मुलाची किंवा मुलीची हत्या कोणी आणि का केली, जिल्ह्यातून किंवा आसपासच्या भागातून कोणी बालक बेपत्ता आहे का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे देवखेरकी परिसरात भीतीचे सावट पसरले असून, गुन्हेगाराला लवकरात लवकर बेड्या ठोकण्याची मागणी होत आहे.
Web Summary : A charred human skeleton, possibly of a child, was discovered in a mango orchard in Chiplun, Konkan. The body was found in a bag, suggesting a planned murder. Police are investigating the gruesome discovery and searching for the culprit.
Web Summary : कोंकण के चिपलून में आम के बाग में एक जले हुए मानव कंकाल, संभवतः एक बच्चे का, मिला। शरीर एक बैग में मिला, जो एक नियोजित हत्या का सुझाव देता है। पुलिस भयावह खोज की जांच कर रही है और अपराधी की तलाश कर रही है।