दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 05:47 IST2025-11-28T05:46:11+5:302025-11-28T05:47:27+5:30
सर्व शक्यता पडताळण्यासाठी अगदी बारकाईने चौकशी करण्यात येत आहे, असे देशमुख यांनी न्यायालयाला सांगितले.

दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
मुंबई - दिवंगत सेलिब्रिटी मॅनजेर दिशा सालियन हिच्या मृत्यूची चौकशी पोलीस आणखी किती काळ करणार आहेत? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी पोलिसांना केला. ‘मृत्यूला पाच वर्षे झाली आहेत आणि पोलिसांना याची खात्री करायची आहे की, ही आत्महत्या आहे की सदोष मनुष्यवधाचे प्रकरण आहे,’ असे न्यायालयाने म्हटले.
दिशा सालियन हिने दि. ८ जून २०२० रोजी मालाड येथील १४ व्या मजल्यावरील राहत्या घरातून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. सरकारी वकील मनकुवर देशमुख यांनी या प्रकरणाचा चौकशी अद्याप सुरू असल्याची माहिती न्यायालयाला दिली. ‘ अजून चौकशीच सुरू आहे? पाच वर्षे झाली. कोणाचातरी मृत्यू झाला आहे. ती आत्महत्या होती की सदोष मनुष्यवध आहे, हे निश्चित करायचे आहे,‘ असे न्या. एस. एस. गडकरी व आर. आर. भोसले यांच्या खंडपीठाने म्हटले.
सर्व शक्यता पडताळण्यासाठी अगदी बारकाईने चौकशी करण्यात येत आहे, असे देशमुख यांनी न्यायालयाला सांगितले. दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियन यांनी केला आहे. तिच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सतीश सालियन यांनी केली आहे. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी या याचिकेत मध्यस्थी करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. कोणतेही आदेश देण्यापूर्वी आधी आपले म्हणणे ऐकून घ्यावे, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी न्यायालयाला केली आहे. सतीश सालियन यांनी दाखल केलेली याचिका खोटी, क्षुल्लक आणि प्रेरित आहे, असा आदित्य ठाकरे यांनी अर्जात म्हटले आहे.
न्यायालयातील युक्तिवाद
देशमुख यांनी न्यायालयाला सांगितले की, याचिकाकर्ते आणि त्यांच्या पत्नीचा जबाब अनेकवेळा पोलिसांनी नोंदविला आहे. त्यावेळी त्यांनी कोणावरही संशय नसल्याचे सांगितले होते. आता पाच वर्षांनी वडिलांनी याचिका दाखल केली. पोलिस जबाबाच्या प्रती, तपासाची कायद्याने परवानी असलेली कागदपत्रे वडिलांना का देत नाही? पीडितेचे वडील असल्याने त्यांना ती कागदपत्रे द्यावीत, असे म्हणत न्यायालयाने पुढील सुनावणीत सरकारी वकिलांना सतीश सालियन यांना कागदपत्रे देण्याबाबत पोलिसांची भूमिका काय आहे, हे स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.