मोठ्या स्वप्नांच्या पाठलाग करत येमेनमध्ये पोहोचलेली केरळची नर्स निमिषा प्रिया हीला आता फाशीची शिक्षा होणार आहे. १६ जुलै रोजी तिला फाशी दिली जाणार आहे. येमेनी नागरिक असलेल्या तलाल अब्दो महदीच्या हत्येत दोषी आढळली आहे. निमिषाने मोठे स्वप्न पाहिले होते, पण नियतीने तिला इतक्या मोठ्या संकटात कसे आणले, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तिने तलालने आपली फसवणूक केल्याचे म्हटले होते.
स्वप्नांची सुरुवात, आणि एका चुकीच्या भेटीने बिघडलेले आयुष्य!निमिषा प्रियाला येमेनची राजधानी सना येथील एका आरोग्य केंद्रात नोकरी मिळाली होती, पण तिचे खरे स्वप्न स्वतःचे क्लिनिक उघडण्याचे होते. सर्व काही सुरळीत सुरू होते. २०११ मध्ये ती कतारमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या टॉमी थॉमसशी लग्न करण्यासाठी भारतात आली. लग्नानंतर हे जोडपे येमेनला परतले आणि त्यांना एक मुलगीही झाली.
२०१४ मध्ये निमिषा आपले क्लिनिक सुरू करण्याच्या तयारीत होती. याच दरम्यान, ऑक्टोबर २०१४ मध्ये तिची भेट यमनच्या तलाल अब्दो महदीशी झाली, आणि इथूनच तिच्या आयुष्यात वादळाची सुरुवात झाली.
कशी झाली भेट?तलालचे कुटुंब निमिषा जिथे काम करत होती, त्या क्लिनिकमध्ये नियमितपणे येत असे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, याच ठिकाणी त्यांची पहिली भेट झाली आणि तलालने निमिषाला मदत करण्याची तयारी दर्शवली. त्यावेळी निमिषाला तो एक चांगला मार्गदर्शक वाटला. येमेनच्या कायद्यानुसार, तिथे क्लिनिक उघडण्यासाठी स्थानिक 'स्पॉन्सरशिप'ची गरज असते. त्यामुळे निमिषाने तलालला कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यास मदत करण्याची विनंती केली. रिपोर्ट्सनुसार, निमिषाने तलालला ६ लाख येमेनी रियाल (जवळपास १.९२ लाख रुपये) भाड्यासाठी आणि परवानग्या मिळवण्यासाठी दिले होते.
क्लिनिक सुरू झाले, पण छळही सुरू झाला...अनेक अडचणींनंतर, एप्रिल २०१५ मध्ये निमिषाने आपले क्लिनिक सुरू केले. पण, त्याचवेळी तलालचा खरा चेहरा समोर आला. निमिषा आणि तिच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, तलालने आता क्लिनिकमध्ये भागीदारीची मागणी सुरू केली. त्याने कथितपणे बनावट कागदपत्रे तयार करून क्लिनिकमध्ये ३३ टक्के हिस्सा मागितला. एवढेच नाही, तर त्याने निमिषाचा पासपोर्ट जप्त केला आणि दोघांचे लग्न झाल्याचे दाखवण्यासाठी बनावट विवाह प्रमाणपत्रही बनवले.
निमिषा जेव्हा ही कागदपत्रे घेऊन न्यायालयात गेली, तेव्हा ती खोटी कागदपत्रे खरी मानली गेली. जेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले, तेव्हा निमिषा आणि तलाल दोघांनाही काही काळ तुरुंगात टाकण्यात आले. निमिषाने तलालवर शारीरिक आणि लैंगिक हिंसाचाराचे आरोप केले होते. तिच्या तक्रारींच्या आधारावर तलाल अनेकदा तुरुंगात गेला. फेब्रुवारी २०१६ मध्ये कोर्टाने निमिषाची मालमत्ता आणि क्लिनिकची कागदपत्रे तिला परत केली.
आणि इथूनच सारे बिघडले...तलाल फसवणुकीच्या आणखी एका प्रकरणात पुन्हा तुरुंगात गेला. आता बाहेर असलेल्या निमिषाला तिच्या पासपोर्टची गरज होती. त्यामुळे तिने तलालला भेटायला तुरुंगात जाण्यास सुरुवात केली. ती त्याला सतत कागदपत्रे परत करण्यास आणि खोटे लग्न संपवण्यासाठी घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करण्यास सांगत असे.
ती 'भेट' ठरली काळ!जुलै २०१७ मध्ये अशाच एका भेटीसाठी निमिषा तुरुंगात गेली. भेटताना तिने पासपोर्ट मिळवण्यासाठी तलालला इंजेक्शन दिले, पण त्याचा ओव्हरडोस झाल्याने तलालचा मृत्यू झाला. निमिषाने यमनमधील एका सहकारी नर्सची मदत मागितली, जिने कथितपणे मृतदेहाचे तुकडे करून पाण्याच्या टाकीत फेकण्याचा सल्ला दिला.
नंतर दोघीही पोलिसांच्या हाती लागल्या. निमिषाला अटक करण्यात आली आणि २०२० मध्ये स्थानिक कोर्टाने तिला तीनदा फाशीची शिक्षा सुनावली. यमनच्या सर्वोच्च न्यायालयाने दोन शिक्षा कायम ठेवल्या.