'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 14:07 IST2025-11-21T14:07:07+5:302025-11-21T14:07:58+5:30
मित्र आणि शेजाऱ्यांनी केलेली ही थट्टा एका पतीला इतकी झोंबली की, त्याने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला.

'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्..
एका गोऱ्या बाळाच्या जन्मामुळे त्याच्या आईला आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. "तू काळा असून तुझा मुलगा गोरा कसा जन्मला?" मित्र आणि शेजाऱ्यांनी केलेली ही थट्टा एका पतीला इतकी झोंबली की, त्याने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. याच संशयातून आणि वादातून पतीने आपल्या पत्नीची गळा चिरून तिची निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील आबादपूर पोलीस स्टेशन अंतर्गत नारायणपूर गावात घडली आहे.
थट्टामस्करीने घेतला जीव
आजमनगर पोलीस ठाण्याच्या जलकी गावचा रहिवासी असलेल्या सुकुमार दास याच्या पत्नीने तीन महिन्यांपूर्वी एका मुलाला जन्म दिला होता. या जोडप्याला आधीही एक मुलगा होता, पण तो गोरा नव्हता. सुकुमार दास यांचा रंगही सावळा असल्याने, दुसऱ्या नवजात मुलाचा गोरा रंग पाहून त्यांना पत्नीच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला.
या संशयात भर घालण्याचे काम सुकुमारचे मित्र आणि शेजारी करत होते. "अरे तू तर काळा आहेस, मग तुझा मुलगा गोरा कसा जन्मला?" असे टोमणे मारून ते सुकुमारची थट्टामस्करी करत होते. या टिंगलटवाळीमुळे सुकुमारचा संशय अधिकच बळावला आणि त्याला हा मुलगा आपला नसल्याची खात्री पटू लागली.
चारित्र्यावर संशय, तीन महिने सुरू होता वाद
गोऱ्या मुलाच्या जन्मावरून सुकुमार दासने पत्नी मौसमी दास हिच्याशी रोज भांडणे सुरू केली होती. तो वारंवार मुलाच्या खऱ्या बापाबद्दल विचारपूस करायचा. मौसमी वारंवार हा मुलगा त्याचाच असल्याचे सांगत होती, पण संशयाने ग्रासलेल्या सुकुमारला तिचे म्हणणे पटत नव्हते. रोजच्या या भांडणांना कंटाळून आणि पतीच्या त्रासाला वैतागून मौसमीने आपल्या वडिलांना बोलावले आणि ती मुलाला घेऊन माहेरी, म्हणजे नारायणपूर गावी निघून गेली होती. गेली जवळपास तीन महिने त्यांच्यात याच विषयावरून तीव्र वाद सुरू होता.
माहेरी येऊन पतीने केली निर्दयी हत्या
बुधवारी सुकुमार दास आपल्या सासुरवाडीला आला. सुकुमारचे सासरे षष्टी दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या मंडळींनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. रात्री जेवण झाल्यावर सर्वजण झोपायला गेले. मात्र, रात्र होताच आरोपी जावई सुकुमार दासने क्रौर्याची सीमा ओलांडली. त्याने पत्नी मौसमी दास हिचा गळा धारदार शस्त्राने चिरला. इतकेच नव्हे, तर त्याने तिच्या शरीरावर खासगी भागांवरही अनेक वार केले. या हल्ल्यात मौसमीचा जागीच मृत्यू झाला.
खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडला मृतदेह
दुसऱ्या दिवशी सकाळी घरातल्यांना मौसमीच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला, तसेच आतून बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. जेव्हा कुटुंबीयांनी आत प्रवेश केला, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मौसमी रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेली होती, तर आरोपी पती सुकुमार दास घटनास्थळावरून फरार झाला होता.
कुटुंबीयांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. आबादपूर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. मृत महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सनकी जावयाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध सुरू केला आहे. पोलीस आरोपीच्या संभाव्य ठिकाणांवर सतत छापेमारी करत आहेत.