मित्राच्या बँक खात्यातील रकमेवर डल्ला मारून बांधले घर, पोलिसांनी असा केला प्रकरणाचा भांडाफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 23:48 IST2021-07-13T23:47:40+5:302021-07-13T23:48:28+5:30
Crime News: लॉकडाऊनच्या काळात गावातील मित्राने सोबत राहून त्याच्याच बँक खात्यावर ऑनलाईन डल्ला मारला. या पैशांतून त्याने गावी घर बांधल्याचा प्रकार मुंबई पोलिसांच्या पूर्व विभाग सायबर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आला आहे.

मित्राच्या बँक खात्यातील रकमेवर डल्ला मारून बांधले घर, पोलिसांनी असा केला प्रकरणाचा भांडाफोड
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात गावातील मित्राने सोबत राहून त्याच्याच बँक खात्यावर ऑनलाईन डल्ला मारला. या पैशांतून त्याने गावी घर बांधल्याचा प्रकार मुंबई पोलिसांच्या पूर्व विभाग सायबर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आला आहे. प्रदिपकुमार साहू असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या जवळून तीन मोबाईल फोन, बँक खात्यांची पासबुक, ६ एटीएम कार्ड आणि १ लाख रुपये रोख रक्कम असा ऐवज जप्त केला आहे. (The house was built on a friend's bank account, one arrest from Uttar Pradesh)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील साहुने तक्रारदार यांच्या बँक खात्यातून २ लाख ६० हजार ७५३ रुपयांवर ऑनलाईन डल्ला मारला होता. त्याने ही रक्कम उत्तर प्रदेशमधील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा बँकेतील खात्यांवर वळती केली होती. त्याआधारे तपास करत सायबर पोलिसांनी आरोपींचा माग काढत उत्तर प्रदेश गाठले.
ज्या खात्यांवर ही रक्कम जमा झाली होती, ते खातेधारक बँकांचे सेवा केंद्र चालवत असल्याचे समोर आले. त्यांच्याकडे अधिक चौकशीमध्ये एका महिलेने तिच्या भावाच्या शस्त्रक्रियेसाठी पतीने रक्कम पाठवल्याची बतावणी करुन ही रक्कम काढून घेतल्याचे त्यांनी सांगितले.
अशात पैसे काढणारी महिला गावातील मित्र साहू याची पत्नी असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली. साहू यानेच लॉकडाऊनच्या काळात सोबत राहताना तक्रारदार यांना त्यांच्या मोबाईलमध्ये गुगल पे खाते उघडून देऊन त्याआधारे त्यांच्या खात्यातील रकमेवर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले. अखेर पोलिसांनी सापळा रचून साहू याला प्रयागराजमधून ताब्यात घेत अटक केली आहे. तपासात गावी घर बांधण्यासाठी त्याने हा प्रताप केल्याचे समोर आले.