महिलेची हत्या करून मृतदेह पेटीत कोंबला; सेप्टिक टँकमधील दुर्गंधीने उघडलं 'ते' भयंकर गुपित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 12:26 IST2026-02-13T12:09:55+5:302026-02-13T12:26:34+5:30
मध्य प्रदेशात एका निर्जन ठिकाणी महिलेचा मृतदेह पेटीत सापडल्याने खळबळ उडाली.

महिलेची हत्या करून मृतदेह पेटीत कोंबला; सेप्टिक टँकमधील दुर्गंधीने उघडलं 'ते' भयंकर गुपित
Bhopal Crime: मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधील कमल नगर परिसरात गुरुवारी एका निर्जन प्लॉट्सवरील सेप्टिक टँकमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. अत्यंत क्रूरपणे या महिलेची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पेटीत बंद करून विल्हेवाट लावण्यात आली होती. मृतदेह बाहेर काढल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कमल नगर भागातील एका रिकाम्या आणि निर्जन प्लॉट्सवर असलेल्या सेप्टिक टँकमधून गेल्या काही दिवसांपासून प्रचंड दुर्गंधी येत होती. स्थानिक नागरिकांनी संशय आल्याने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला असता, सेप्टिक टँकमध्ये एक लोखंडी पेटी पडलेली दिसली. ही पेटी बाहेर काढून उघडली असता पोलिसांनाही धक्का बसला. त्यामध्ये एका महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह होता.
टॅटूवरुन पटवणार ओळख
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, हा मृतदेह सुमारे तीन ते चार दिवस जुना आहे. मृतदेहाची अवस्था पाहता ओळख पटवणे कठीण झाले आहे. मात्र, मृत महिलेच्या हातावर काही टॅटू आहेत. पोलीस आता याच टॅटूंच्या आधारे मृत महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. शहरातील बेपत्ता महिलांच्या तक्रारींचीही तपासणी केली जात आहे.
नियोजित कट असण्याची शक्यता
ज्या ठिकाणी मृतदेह सापडला, तो परिसर अत्यंत निर्जन आहे. त्यामुळे गुन्हेगारांनी हा परिसर ओळखूनच हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निवडला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. महिलेची हत्या नेमकी कुठे झाली आणि तिला या पेटीत भरून कोणी आणले, याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक खबऱ्यांची मदत घेतली जात आहे.
फॉरेन्सिक तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण आणि मृत्यूची वेळ स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.