राज्यात ‘एसीबी’च्या ट्रॅपमध्ये अडकणाऱ्यांमध्ये पोलिसांचे प्रमाण सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 06:01 PM2019-12-19T18:01:41+5:302019-12-19T18:02:30+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी २०१९ ते १७ डिसेंबर २०१९ या कालावधीत राज्यात ८२९ सापळे यशस्वी केलेत. त्यात एक हजार १२४ शासकीय अधिकारी, कर्मचारी अडकले

The highest proportion of police in the 'ACB' trap in the state Maharashtra | राज्यात ‘एसीबी’च्या ट्रॅपमध्ये अडकणाऱ्यांमध्ये पोलिसांचे प्रमाण सर्वाधिक

राज्यात ‘एसीबी’च्या ट्रॅपमध्ये अडकणाऱ्यांमध्ये पोलिसांचे प्रमाण सर्वाधिक

Next

 - ज्ञानेश्वर मुंदे 

भंडारा - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ट्रॅपमध्ये राज्यात इतर विभागांच्या तुलनेत सर्वाधिक पोलीस अडकल्याचे दिसत आहे. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत १८८ प्रकरणात २६२ पोलिसांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्हणजे यात वर्ग एकच्या १२ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ५३ लाख ९९ हजार ५५० रूपये लाचेच्या स्वरूपात स्वीकारून पोलिसांनी राज्यातील इतर विभागांनाही मागे टाकले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी २०१९ ते १७ डिसेंबर २०१९ या कालावधीत राज्यात ८२९ सापळे यशस्वी केलेत. त्यात एक हजार १२४ शासकीय अधिकारी, कर्मचारी अडकले आहेत. त्यात लाचखोरीचे सर्वाधिक प्रमाण पोलीस खात्यात असल्याचे यावर्षीच्या कारवाईवरून दिसून येते. १८८ प्रकरणात पोलीस खात्यातील २६२ जणांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यात वर्ग एकचे अधिकारी १२, वर्ग दोनचे ११ अधिकारी तर २०२ तृतीय श्रेणी पोलीस कर्मचारी सापळ्यात अडकले आहे. पोलिसांना लाच घेताना सहकार्य केल्याप्रकरणी ३७ खाजगी व्यक्तींवरही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांचा थेट जनतेशी संबंध येतो. कारवाईची भीती दाखवून नागरिकांना लाच देण्यास अनेकदा बाध्य केले जाते. मात्र काही नागरिक याला बळी न पडता थेट तक्रार करतात. राज्याच्या सर्वच विभागात लाच घेण्यात पोलीस आघाडीवर असल्याचे दिसून येते. 

पोलिसांपाठोपाठ लाच घेण्यात महसूल, भूमिअभिलेख आणि नोंदणी विभागाचे अधिकारी, कर्मचारीही कुठे मागे नाहीत. या विभागात १८२ पक्ररणात २४४ जणांवर कारवाई करण्यात आली. त्या खालोखाल पंचायत समितीत ८४ प्रकरणात ११४ जण लाच प्रकरणात अडकले आहेत. वीज वितरण कंपनीतील ५७ कर्मचारी लाचेच्या प्रकरणात रंगेहाथ सापडले आहेत. शिक्षणासारख्या पवित्र खात्यातही लाचखोर असल्याचे यावर्षीच्या कारवाईतून दिसून आले. २८ प्रकरणात ४४ जणांना लाच घेताना अटक करण्यात आली. 

लाचेची सर्वाधिक प्रकरणे पुणे विभागात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत सर्वाधिक प्र्रकरणे पुणे विभागातील आहे. १७२ प्रकरणात २३९ जणांना लाच घेताना पकडण्यात आले आहे. नाशिक विभागात ११९ प्रकरणात १५८, नागपूर विभागात १०६ प्रकरणात १३६ जण, औरंगाबाद विभागात १२२ प्रकरणात १६६, अमरावती विभागात १०२ प्रकरणात १३९, ठाणे विभागात ९४ प्रकरणात १३१, नांदेड विभागात ७६ प्रकरणात १०३ आणि सर्वात कमी मुंबई विभागात ३८ प्रकरणात ५२ अधिकारी, कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ सापडले आहेत. 

विदर्भात २०८ सापळे
विदर्भातील ११ जिल्ह्यात वर्षभरात २०८ सापळे यशस्वी करण्यात आले. त्यात सर्वाधिक नागपूर जिल्ह्यात ३५, अमरावती २८, यवतमाळ २५, गोंदिया २२, भंडारा २०, अकोला १८, बुलढाणा १७, वाशिम १४, चंद्रपूर ९ आणि वर्धा जिल्ह्यात सात सापळे यशस्वी करण्यात आले आहेत.

Web Title: The highest proportion of police in the 'ACB' trap in the state Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.