धक्कादायक! हल्ल्यात जखमी झालेले काँग्रेसचे नेते हिदायत पटेल यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 09:03 IST2026-01-07T09:02:38+5:302026-01-07T09:03:18+5:30
Hidayat Patel Akola Murder News: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची अकोट तालुक्यातील मोहाळा येथे हत्या. राजकीय वैमनस्यातून चाकू हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती.

धक्कादायक! हल्ल्यात जखमी झालेले काँग्रेसचे नेते हिदायत पटेल यांचा मृत्यू
अकोला: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि अकोल्यातील ज्येष्ठ नेते हिदायतउल्लाखाँ पटेल यांची मंगळवारी हत्या करण्यात आली. अकोट तालुक्यातील मोहाळा या त्यांच्या मूळ गावी हा प्रकार घडला. दुपारी झालेल्या या प्राणघातक हल्ल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोहाळा गावात राजकीय कारणावरून वाद सुरू होता. मंगळवारी दुपारी मतीन पटेल यांच्या गटाने हिदायत पटेल यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पटेल हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने अकोला येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, पण शरीरावर वर्मी घाव बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.
राजकीय वैमनस्यातून हल्ला
हिदायत पटेल हे अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे एक मोठे नाव होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. गावात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षातूनच हा हल्ला झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी आणि समर्थकांनी केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
पोलीस बंदोबस्त तैनात
हल्ल्याच्या घटनेनंतर मोहाळा गावात आणि अकोल्यातील रुग्णालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.